निवडणूक रणधुमाळीत हेरगिरी करणाऱयांची चलती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या हेरगिरी करणाऱयांची चलती आहे. विरोधकांच्या गोटात काय खल सुरू आहे, मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कोणते फंडे अवलंबले जात आहेत, याची खडानखडा माहिती काढण्यासाठी राजकीय पक्षांबरोबरच उमेदवारांनीही हेरगिरी करणाऱया संस्थांची मदत घेतली आहे. त्यासाठी एक लाख रुपयांपासून तब्बल 60 लाख रुपयांचे पॅकेज दिली जात आहेत.

सध्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यासाठी आपली प्रचार यंत्रणा प्रभवीपणे राबवण्याबरोबरच विरोधकांच्या आणि तिकीट नाकारलेल्या नेत्यांच्या दररोजच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी डिटेक्टीव एजन्सींची मदत घेत आहेत. त्यानुसार समोरील उमेदवारांचे कच्चे दुवे शोधणे, विरोधी गोटातील असंतुष्ट असलेल्यांची इत्थंभूत माहिती गोळा करणे, उमेदवाराची गुन्हेगारी स्वरूपाची माहिती मिळवण्याचे काम या डिटेक्टीव एजन्सींना दिले जात असल्याची माहिती असोसिएशन ऑफ प्रायव्हेट डिटेक्टीव ऍण्ड इन्वेस्टीगेटर्सचे अध्यक्ष कुनवार विक्रम सिंह यांनी स्पष्ट केले. आपल्याच पक्षातील ज्या इच्छुकांना उमेदवारी नाकारली आहे त्यांच्यावर खास करून लक्ष ठेवण्यासाठी अनेक उमेदवार स्वतः मोठी किंमत मोजत असल्याचे जीडीएक्स डिटेक्टीवचे व्यवस्थापकीय संचालक महेशचंद्र शर्मा यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांवर नजर

उमेदवाराच्या अवतीभोवती फिरणाऱया कार्यकर्त्यांकडून दगाफटका होण्याची भीती असते. आपल्या गोटातील माहिती विरोधकांपर्यंत पोहचवण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर आपलाच खास कार्यकर्ता पाठीत मागून वार करणार नाही ना याची खातरजमा करण्यासाठी अनेक उमेदवारांनी डिटेक्टीव एजन्सींची मदत घेतली असल्याचे महेशचंद्र शर्मा यांनी सांगितले.