इंशा अल्लाह! जम्मू-कश्मीर हिंदुस्थानपासून वेगळे करू, अब्दुल्लांचा हिरवा फुत्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जम्मू-कश्मीरला विशेषाधिकार देणाऱ्या कलम 370 वरून राजकीय वातावरण तापले आहे. जम्मू-कश्मीरमधील प्रमुख पक्ष नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी यावरून रान उठवले असून रोज नवनवीन वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. आता पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते फारूख अब्दुल्ला यांनी अल्लाहची शपथ घेऊन हिरवा फुत्कार सोडला आणि कलम 370 रद्द केल्यास जम्मू-कश्मीर हिंदुस्थानपासून वेगळा करू अशी भाषा वापरली आहे.

कलम 370 हटवायलाच हवे, काँग्रेस खासदाराचे सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन
कलम 370 रद्द केल्यास कश्मीर हिंदुस्थानशी संबंध तोडेल; मेहबूबा मुफ्ती पुन्हा बरळल्या

एका प्रचारसभेदरम्यान बोलताना फारूख अब्दुल्ला यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. बाहेरून लोक आणून येथे वसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आम्ही शांत बसू? आम्ही याला प्रतिकार करू. कलम 370 कसे रद्द करता ते पाहतो. अल्लाहची शपथ घेऊन सांगतो, अल्लाहला देखील हेच मंजूर असेल की आम्ही यांच्यापासून वेगळे व्हावे, असे फुत्कार फारूख अब्दुल्ला यांनी सोडले. तसेच कलम 370 रद्द करूनच दाखवा, आम्ही पण तयार आहोत विरोध करायला. पाहुया कोण मग यांचा झेंडा उभा करण्यासाठी तयार होतो, अशी वादग्रस्त भाषा वापरत अब्दुल्ला यांनी एकप्रकारे धमकीच दिली आहे.

जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणारे संविधातील कमल 370 आणि 35 अ रद्द करण्याच्या हालचाली सुरू असल्याने आपले अस्तित्व टिकवण्यासाठी येथील राजकीय पक्षांचे हिंदुस्थानविरोधी प्रयत्न सुरू आहेत. फारूख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी 370 कलम रद्द केल्यास हिंदुस्थानपासून जम्मू-कश्मीर वेगळा होईल अशी भाषा वापरली आहे. आता फारूख अब्दुल्ला यांनी केलेल्या आणखी एका विखारी वक्तव्यामुळे हा वाद भडकण्याची शक्यता आहे.