मायदेशी पैसा पाठवण्यात अनिवासी हिंदुस्थानी अव्वल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

अनिवासी हिंदुस्थानींनी गेल्या वर्षी नवा विक्रम केला. मायदेशी पैसा पाठवण्यात अनिवासी हिंदुस्थानी अव्वल असल्याचे जागतिक बँकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. चीन, मेक्सिको या देशांनाही अनिवासी हिंदुस्थानींनी मागे टाकत 2018 मध्ये तब्बल 79 अब्ज डॉलर्स मायदेशी पाठवले.

जागतिक बँकेने नुकताच ‘स्थलांतर व विकास’ या विषयावरील आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात चीन व मेक्सिकोला मागे टाकून अनिवासी हिंदुस्थानींनी मायदेशी पैसा पाठवण्यात अव्वल क्रमांक मिळवल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी अनिवासी हिंदुस्थानींनी मायदेशी 79 अब्ज डॉलर्स पाठवले. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी रक्कम आहे. अनिवासी चिनी नागरिकांनी 67 अब्ज डॉलर्स पाठवले असून त्याखालोखाल मेक्सिकन नागरिकांनी 36 अब्ज डॉलर्स पाठवले आहे. फिलीपिन्स नागरिकांनी 34 अब्ज डॉलर्स तर रोमन नागरिकांनी 29 अब्ज डॉलर्स मायदेशी पाठवले.

केरळी लोकांनी पाठवला सर्वाधिक पैसा

2018 मध्ये अनिवासी हिंदुस्थानी नागरिकांनी मायदेशी पाठवलेल्या पैशांमध्ये 14 टक्क्यांची वाढ झाल्याचे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे. केरळात आलेल्या महापुराच्या वेळी हा मदतीचा ओघ प्रचंड वाढला होता. परदेशात असलेल्या केरळी नागरिकांनी आपल्या नातलगांच्या मदतीसाठी पैशांच्या राशीच ओतल्या होत्या.