
सामना ऑनलाईन । नागपूर
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट रॅन्किंग फ्रेमवर्क’ अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रॅन्किंग’ जाहीर करण्यात आले. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था मागे पडल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’ (विश्वेश्वरय्या इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपुरातील एकाही संस्थेला अभियांत्रिकी गटात पहिल्या 35 मध्ये ‘रॅन्किंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा देशात 31 वा क्रमांक आहे. मागील वर्षीदेखील ‘व्हीएनआयटी’चा 31 वाच क्रमांक होता. ‘टॉप’ 100 विद्यापीठांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुठेही समावेश नाही.
देशातील विद्यापीठांचे तसेच विविध शैक्षणिक संस्थाचे ‘रॅन्किंग’ ठरविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रस्ताव मागविले होते. देशभरातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांनी हे प्रस्ताव जानेवारी महिन्यात सादर केले होते. नागपूर विद्यापीठ तसेच जिह्यातील शैक्षणिक संस्थांचादेखील यात समावेश होता.
























































