
सामना ऑनलाईन । नागपूर
वाघ वाचविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न होत असताना वाघांच्या मृत्यूची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. राज्यात गेल्या तीन महिन्यांत पाच वाघांचा मृत्यू झाला. यात नागपूर आणि अमरावती जिह्यातील प्रत्येकी दोन वाघ दगावले असून एक यवतमाळ जिह्यातील आहे. सर्वच वाघ नसैर्गिक कारणामुळे गतप्राण झाले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. यामुळे वनसंवर्धन आणि संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
देशातील वाघांची राजधानी असे बिरुद मिरविणाऱ्या महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत असताना होणारे मृत्यू चिंता वाढवणारे आहेत. पेच व्याघ्रप्रकल्पातील देवलापार वनपरिक्षेत्रात पहिली घटना घडली. दुसऱ्याच दिवशी चिखलदरा मोथा येथे मेळघाट व्याघ्रप्रकल्पात दुसरा वाघ दगावला. अकोट तालुक्यातील देवलापार वनपरिक्षेत्रात चौथा आणि यवतमाळ जिह्यातील पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात पाचव्या वाघाचा मृत्यू झाला. दगावलेल्या पाचांपैकी तीन वाघीण आहेत. चंद्रपूर जिह्यात सर्वाधिक वाघ असूनही तिथे एकही वाघाचा मृत्यू न होणे हे वन्यप्रेमींना सुखद धक्का देणारी बाब ठरली आहे.
वाघांच्या अवशेषांना परदेशी बाजारात मोठी किंमत असल्याने स्थानिकांच्या मदतीने बरेचदा वाघांसाठी जाळे पसरवून त्यांची शिकार केली जाते. यासाठी अनेक पर्याय वापरण्यात येत असले तरी नैसर्गिक पाणवठय़ांवर तृणभक्षक प्राण्यांची शिकार करण्यासाठी पाण्यात कीटकनाशक मिसळून वाघांची शिकार होत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उन्हाळय़ात वनकर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
देशात 2018 मध्ये 49 टक्के वाघांचा मृत्यू हे व्याघ्रप्रकल्पाबाहेर झाल्याचे समोर आले आहे राज्यात हा आकडा 75 टक्के इतका आहे. मागील वर्षी सुमारे 100 वाघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यात सर्वाधिक 27 मृत्यू हे मध्य प्रदेशात झाले. महाराष्ट्रात 20 वाघांचा मृत्यू झाला असून त्यातील 15 वाघ हे व्याघ्र प्रकल्पाबाहेर राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाघांच्या मृत्यूची आकडेवारी
- मार्च 2019 ……. 5
- 2018 ………….. 22
- 2017 ………….. 21
- 2016 ………….. 14
- 2015 ………….. 9




























































