
सामना प्रतिनिधी, नवी मुंबई
ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवी मुंबईतील मुस्लिम समाज शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला आहे. एपीएमसी मार्केटमधील माथाडी भवन येथे नवी मुंबई मुस्लिम एकता फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये शहरातील 40 मशिदींच्या प्रमुखांनी आणि पदाधिकाऱयांनी महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम समाजाचे सर्वच नेते महायुतीच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
माथाडी भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने, मुस्लिम समाजाचे नेते आलम बाबा, एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहम्मद सलीम शेख, आश्रफ मियाजी आदी उपस्थित होते.





























































