आम्ही देव पाहिला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

माझ्या इंजिनीअरिंगने आधी माझी नागपूरशी गाठ बांधली आणि क्रिकेटने ती घट्ट केली.

आणि मी कबूल करतो की, मला नागपूर आवडतं, पण हिवाळ्यातलं! माझी नागपूरशी गाठ मारली गेली ती 1980 साली. तेव्हाचं नागपूर आणि आजचं नागपूर यात पूर्वीचा विराट आणि आजचा विराट एवढा फरक आहे. तेव्हाचं नागपूरही तसं ऐसपैस होतं. रस्ते रुंद होते. शहर दूरवर पसरलं होतं. नागपूरच्या हवेत आणि नागपूरकरांच्या बोलण्यात मस्त ऐसपैसपणा होता. अगदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसारखा. मनात आलं बोलून टाकलं. महिना-सवा महिना मी नागपुरात होतो, पण मुंबईत परतताना ‘‘कुठे जाऊन राहिलाय बे!’’, ‘‘गावसकर काय खेळून राहिलाय बे!’’ अशी वाक्यं जिभेवर ठाण मांडून होती. तो भाषेचा हँगओव्हर जायला आणखी एक महिना गेला. आपण ज्याला रस्त्यावरची खडी म्हणतो, त्याला ‘गिट्टय़ा’ हा शब्द किती महिने मी वापरत होतो. त्यावेळी घरात खिडकी-दरवाजांना लावलेले वाळय़ाचे पडदे ही माझ्यासारख्या जन्मजात मुंबईकरांच्या दृष्टीने नवलाईची गोष्ट होती. त्यावर मारलं जाणारं पाणी, त्या वाळय़ाचा वास या मुंबईत औषधालाही न सापडणाऱया गोष्टी. मला तिथे विश्वेश्वरय्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये मुंबई महापालिकेतर्फे पाण्याच्या टाक्यांच्या डिझाईनच्या खास कोर्ससाठी ‘पाठवले’ गेले होते. माझ्याप्रमाणे तिथे पंजाब, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, केरळ, तामीळनाडू वगैरेवरून आणखी काही तरुण इंजिनीअर आले होते. बरं, ‘कोर्स’ म्हणजे ‘‘चला, सरकारी खर्चात मौजमजा करूया’’ असा प्रकार नव्हता. सकाळी 11 ते 5 अभ्यास आणि प्रत्येक 12 दिवसांच्या कोर्सनंतर परीक्षा! आम्ही सर्व वेगवेगळय़ा प्रांतांतले असल्यामुळे एकसंध व्हायला वेळ लागेल असं मला वाटलं होतं, पण 15-20 पुरुष दोन गोष्टींमुळे चटकन एकत्र येऊ शकतात. एक मद्य आणि दुसरी ललना हा विषय. आमच्यातला त्यातल्या त्यात एक स्मार्ट हिमाचल प्रदेशचा इंजिनीअर तिथलं इंग्लिश वर्तमानपत्र घेऊन आला माझ्याकडे. त्यात एक बातमी होती, ‘इतवारीतल्या वेश्यांचा त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा.’ त्याला विचारायचं होतं, ‘‘इतवारी कुठाय?’’ पण त्याने विचारलं, ‘‘बातमी वाचली का?’’ सकाळी लेक्चरला जाण्याच्या गडबडीत मी पेपर नीट वाचला नव्हता. मी त्याला प्रश्नार्थक नजरेने विचारलं, ‘‘बरं, तर?’ अचानक डायनिंग टेबलवरच्या सर्वांनी म्हटलं, ‘‘आम्हाला इतवारी पाहायचीय. तू एकमेव मराठी आहेस आणि आपण महाराष्ट्रात आहोत. तू घेऊन जायचंस.’’ मराठी माणसाकडे देशाचं नेतृत्व इतक्या सहज कधीच आलं नव्हतं. दुसऱया दिवशी संध्याकाळी चार-पाच सायकलरिक्षा करून आम्ही इतवारीत गेलो. कॉलेजपासून खूप दूर होती. रेल्वे ट्रक ओलांडून पलीकडे गेलो होतो. पाऊस पडल्यामुळे चिखल झाला होता. मोठी बाजारपेठ तिथे होती आणि तिथेच वेश्यावस्ती! मुंबई किंवा इतर शहरांतल्या वस्तींपेक्षा फारशी वेगळी नव्हती. अशी दयनीय अवस्थेतली वस्ती पाहिल्यावर माझ्या अंगावर रोमांच उभे राहत नाहीत. उलट ‘जिन्हे नाझ है हिंद पर वो कहां है’ म्हणणारा गुरुदत्त मला आठवतो. माझ्या बरोबरची मंडळीही फक्त कुतुहलापोटी आली होती हे मला जाणवलं. ती अशी जागा होती जिथे वासनेच्या घोडय़ावरून भरधाव निघालेल्या पुरुषालाच आकर्षण वाटेल.

पण त्यानिमित्ताने आम्ही एकत्र आलो. प्रांताच्या आणि भाषेच्या भिंती चटकन कोसळल्या. आम्हाला प्रत्येक कोर्सनंतर एक तीन दिवसांची सुट्टी असे. त्या सुट्टीत मी त्यांना नागपूरभोवतीच्या माझ्या आवडीच्या जागा फिरवल्या. पहिल्या सुट्टीत मी त्यांना जवळ रामटेकला घेऊन गेलो. मला जायचंच होतं तिथे! कालिदासाने तिथे बसून ‘मेघदूत’ लिहिलं म्हणतात. संस्कृतमधला सर्वश्रेष्ठ कवी आणि नाटककार तो! त्याच्या लिखाणातून घेतलेल्या अनेक उपमा, अलंकारांनी मी माझे निबंध एकेकाळी सजवले होते. साधं ‘‘आनंद झाला’’ म्हणायलाही मी ‘‘माझं मानस पद्मप्रस्प्फुटित झालं’’ वगैरे म्हणायला लागलो. त्यांना अर्थातच कालिदास ठाऊक होता.

पुढचा कोर्स संपायच्या आधी आमच्या ‘भारत जोडो’ संस्थेने मला विचारलं, ‘‘आता कुठे जायचं?’’
मी म्हटलं, ‘‘पवनारला’’. प्रत्येकाच्या कपाळाच्या आठीवरून मला कळलं की, ‘पवनार’ हा शब्द त्यांच्यासाठी चिनी शब्दासारखा आहे, अगम्य! मग मी त्यांना विनोबा भावे, त्यांची भूदान चळवळ, त्यांचा गीतेचा अभ्यास, गांधीजींचे शिष्यत्व वगैरे सांगितलं. त्यांच्यातल्या विक्षिप्त ज्ञानी पुरुषाचे मी काही किस्से सांगितले. 1974 साली इंदिरा गांधींनी अणुस्फोट केला. त्यानंतर कुणीतरी त्यांना विचारलं, ‘‘अणुस्फोटाबद्दल काय वाटतं?’’ त्यांनी सांगितलं, ‘‘मी चंद्रावर राहायला गेल्यावर अभिनंदन करेन.’’ उत्तर अर्थपूर्ण, पण सांगण्याची पद्धत विक्षिप्त. सर्वांमध्ये कुतुहल जागृत झालं. आम्ही पवनारला गेलो, पण पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. तेव्हा ‘बाबा’ झोपले होते. तिथली एक कार्यकर्ती म्हणाली, ‘‘बाबा, सूर्यास्ताला झोपतात आणि सूर्योदयाला उठतात. आता तुम्हाला भेटता येणार नाही.’’ आम्ही आश्रम फिरलो, पण विनोबांना पाहिलं. पोटाशी पाय घेऊन शरीराचं मुटकुळं करून झोपलेल्या अवस्थेत, पण त्या सर्वांना आपण एक कुणीतरी वेगळा माणूस पाहिल्याची जाणीव झाली.

पण त्याहीपेक्षा ते नतमस्तक झाले, आम्ही पुढच्या सुट्टीत बाबा आमटेंकडे गेलो तेव्हा! मला वाईट वाटलं की, त्यांचं नाव कुणाच्याही कानावरून गेलं नव्हतं. महाराष्ट्रातली आभाळाएवढी माणसं बाहेर माहीत नसावीत यात आपली चूक आहे. त्यातला एक तामीळ इंजिनीअर तर बाबांच्या आडनावाचा उच्चार सारखा ‘‘आमटी’’ असा करायचा. मी त्याला म्हटलं, ‘‘आधी उच्चार शंभरवेळा घोक, त्याशिवाय मी तुला नेणार नाही.’’ बाबा आमटेंना भेटल्यावर सर्व दिङ्मूढ झाले. त्यावेळी बाबा पाठीच्या दुखण्यामुळे झोपून असत. मला आठवतंय, विकास आमटेने आम्हाला आनंदवन फिरवलं होतं. तिथल्या कुष्ठरोग्याने तयार केलेल्या जेवणावर आम्ही ताव मारला. आमच्या सर्वांच्या आयुष्यातलं ते सर्वात रुचकर जेवण होतं. एक माणूस आपली सर्व सुखं बाजूला ठेवून कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करतो, त्यात त्याचं कुटुंब सामिल होते हा त्यांच्यासाठी गोड सामाजिक धक्का होता. परतताना त्या सर्वांच्या डोळय़ांत अश्रू होते. त्या अश्रूत मिश्र भावना होत्या. इतवारीच्या वेश्यावस्तीने सुरू झालेला आमचा प्रवास आनंदवनात संपला. निघताना मी म्हटलं, ‘‘आपण सर्व देव देवळात, मशिदीत, चर्चमध्ये शोधतो, पण देव माणसातच असतो.’’ सर्वांनी एकमुखाने देवदर्शन झाल्याचं कबूल केलं.

[email protected]