“त्याला हरवूनच मी काय आहे ते दाखवून देईन”, जया प्रदा यांचे आझम खान यांना प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी जया प्रदा यांच्यावर अश्लील शब्दात केलेल्या टीकेला जया प्रदा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “मी आझम खानला घाबरून रामपूरमधून पळणार नाही, तर त्याला हरवूनच मी काय आहे ते दाखवून देईन” असा ठाम विश्वास व्यक्त करत जया प्रदा यांनी आझम खान यांना प्रत्युत्तर दिले आहे.

“त्याच्या राजकीय दर्जा खालावला आहे. त्याने बोललेले शब्द मी तोंडाने पुन्हा उच्चारूही शकत नाही. त्याच्या विरोधात एफआयआर दाखल झाली आहे. त्याला निडणूक लढवण्यास बंदी घालावी. अशी माणसे जर निवडून आली तर लोकशाहीचे काय होईल, समाजात महिलांना स्थान उरणार नाही. त्यामुळे जनता देखील त्याला सोडणार नाही, मी त्याचा पराभव करूनच मी काय आहे हे त्याला दाखवून देईन” असा पलटवार जया प्रदा यांनी केला आहे. 2009 मध्ये देखील त्याने माझ्या विरोधात असे घाणेरडे वक्तव्य केले होते. मात्र त्यावेळी मला कुणीही साथ दिली नव्हती अशी अगतिकता जया प्रदा यांनी व्यक्त केली. मी मेल्यावर याला समाधान होणार आहे का? असा सवाल जया प्रदा यांनी केला आहे.

आझम खान यांनी रामपूरमधून भाजपच्या उमेदवार असलेल्या जया प्रदा यांच्यावर केल्याने टीकेची सर्व स्तरातून त्यांची निंदा होत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने देखील आझम खान यांनी केलेल्या अश्लील टीकेची दखल घेऊन त्यांना नोटीस बजावली आहे. तसेच आझम खान यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.