
सामना ऑनलाईन । रांची
झारखंडमधील बेलभाघाट जंगलामध्ये सोमवारी सकाळी 6.15 वाजता नक्षलवादी आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये जोरदार चकमक उडाली. या चकमकीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यावेळी नक्षलवाद्यांच्या गोळीबारात एक जवानही शहीद झाला.घटनास्थळावरून जवानांनी एके-47 रायफल, तीन मॅगझिन, चार पाइप बॉम्ब जप्त केले आहेत. नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्याची ही कारवाई सीआरपीएफच्या 7 बटालियनने केली.
या आधी छत्तीसगढमध्ये भाजपाचा ताफा निवडणूक प्रचाराहून परतत असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात दंतेवाडाचे भाजप आमदार भीमा मंडावी यांचा मृत्यू झाला. तर 4 जवान शहीद झाले होते. ही घटना लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या अगोदर दोन दिवस घडली होती. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी जवानांनी कडक पावले उचलली आहेत.
बेलभाघाट परिसरात नक्षलवाद्यांच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळीच जवानांनी नक्षलवाद्यांना चहूबाजूंनी घेरून त्यांना शरण येण्याचे आवाहन केले. परंतु याकडे दुर्लक्ष करीत नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू ठेवला. त्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यावेळी नक्षलवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला.






























































