
सामना ऑनलाईन। बंगळुरू
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी कर्नाटकात चित्रदुर्गमध्ये होते तेव्हा त्यांच्या हेलिकॉप्टरमधून एका काळय़ा रंगाचा बॉक्स उतरविला होता. या रहस्यमय बॉक्सच्या चौकशीची मागणी काँग्रेसने केलेली असताना त्यावर भाजपने खुलासा केला आहे. या बॉक्समध्ये भाजपचे प्रचारसाहित्य होते. यामध्ये मोदी भाषण करण्यापूवीं व्यासपीठावर ज्या वस्तू लागतात त्या होत्या.
यामध्ये टेलेप्रॉम्टर, त्यांच्या केबल्स, पक्षाचे बोधचिन्ह, याशिवाय स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचेही काही साहित्य यामध्ये होते असा दावा चित्रदुर्ग भाजपचे अध्यक्ष के. एस. नवीन यांनी केला आहे.पंतप्रधानांच्या ताफ्यात काय काय असते याची राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना (काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव) माहिती नसेल तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. हे (काँग्रेस) लोक पाच वर्षांपासून सत्तेपासून दूर आहेत. यामुळे पंतप्रधानांना कोणती सुरक्षा असते हे ते विसरून गेले असावेत असा टोला नवीन यांनी गुंडूराव यांना लगावला आहे.



























































