अखेर रायडू सोशल मीडियावर व्यक्त झाला, शंकरच्या निवडीवरून निवड समितीला टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ सोमवारी जाहीर करण्यात आला. मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूला संघामध्ये स्थान मिळाले नाही. रायडूऐवजी अष्टपैलू विजय शंकरला निवड समितीने झुकते माप दिले. संघ निवडीच्या तब्बल 24 तासानंतर रायडू सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे.

#WorldCup2019 पंत नाही तर ‘या’ खेळाडूसाठी गंभीर दु:खी, थेट चर्चेसही तयार

सोमवारी निवड समितीचे प्रमुख एसएमके प्रसाद यांनी विजय शंकरचा ‘3-डायमेंशनल’ खेळाडू असा उल्लेख केला होता. यालाच उपरोधीत टोला लगावताना रायडूने सोशल मीडियावर आपल्या भावना मोकळ्या केल्या. ‘विश्वचषक पाहण्यासाठी आत्ताच ‘3 डी’ चष्मा ऑर्डर केला आहे’, असे ट्वीट रायडूने केले आहे.

रायडूला आम्ही अनेक संधी दिल्या, परंतु विजय शंकर हा ‘3-डायमेंशनल’ खेळाडू आहे. तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्येही उपयुक्त योगदान देऊ शकतो. विजय शंकर हा चौथ्या क्रमांकासाठी चांगला पर्याय असल्याचे निवड समितीचे प्रमुख एसएमके प्रसाद यांनी म्हटले होते.

दरम्यान, आयपीएलमध्ये विजय शंकर रायडूपेक्षाही चांगले प्रदर्शन करत आहे. रायडूने आतापर्यंत 8 सामन्यात फक्त 19.71 च्या सरासरीने 138 धावा केल्या, तर शंकरे 7 सामन्यात 22 च्या सरासरीने 132 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीतही तो उपयुक्त ठरत आहे.