
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
12 राज्यांतील 96 आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एका लोकसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान होत आहे. या टप्प्यात दिग्गजांच्या भवितव्याचा फैसला मतपेटीत बंद होईल. यात माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, पोन राधाकृष्णन, जुअल ओराम, काँग्रेस नेते विरप्पा मोईली, राज बब्बर, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला, द्रमुक नेते दयानिधी मारन, ए. राजा, कनिमोझी, मथुरा येथून हेमामालिनी या उमेदवारांचा समावेश आहे.
उत्तर प्रदेशातील आठ मतदारसंघ ः नगिना, अमरोह, बुलंद शहर, अलिगड, मथुरा, आग्रा, फत्तेपूर शिक्री आणि हातीरस मतदारसंघांचा समावेश आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 72 तास आणि बसपा अध्यक्षा मायावती यांना 48 तासांची प्रचारबंदी निवडणूक आयोगाने केली आहे. आज शेवटच्या दिवशी या नेत्यांना प्रचार करता आला नाही. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मतदान होत आहे. उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडी, भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे.
तामिळनाडूतील सर्व 38 मतदारसंघांत मतदान होणार आहे. अण्णा द्रमुकबरोबर भाजपची युती आहे, तर द्रमुकशी काँग्रेसची आघाडी आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री जयललिता आणि माजी मुख्यमंत्री करुणानिधींचे निधन झाले आहे. कोणत्याही स्टारविना पहिल्यांदा तामिळनाडूत निवडणूक होत आहे.
ओडिशात पाच लोकसभा मतदारसंघांबरोबर विधानसभेच्या 35 जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाचे गेली 15 वर्षे येथे सरकार आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठsची आहे.
राज्ये आणि मतदारसंघ
तामिळनाडू – 38, कर्नाटक – 14, महाराष्ट्र – 10, उत्तर प्रदेश – 8, आसाम, बिहार आणि ओडिशा प्रत्येकी – 5, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल प्रत्येकी – 3, जम्मू-कश्मीर – 3, मणीपूर, त्रिपुरा आणि पुडुचेरी प्रत्येकी – 1






























































