लवकरच धारावी पुनर्विकासाच्या भूमिपूजनाला येईन- उद्धव ठाकरे यांचा ठाम विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

धारावी ही अत्यंत सुंदर लोकवस्ती व्हावी हे शिवसेनेचे स्वप्न आहे आणि शिवसेना त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून सर्व परवानग्याही मिळाल्या आहेत, असे सांगतानाच लवकरच धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजनाला येईन असा ठाम विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी तमाम धारावीकरांना दिला.

दक्षिण-मध्य मुंबईतील शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी धारावीच्या 90 फूट रस्ता येथे उद्धव ठाकरे यांची सभा झाली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी धारावीतील कष्टकरी जनतेच्या मेहनतीचे कौतुक केले. ते म्हणाले की, धारावी ही उद्योगनगरी असून येथील लोक मोठय़ा कष्टाने चामडय़ाच्या वस्तू व अन्य वस्तू बनवतात. या वस्तूंवर मोठय़ा कंपन्यांची लेबले लागली की त्याचे दर शतपटीने वाढतात. धारावीकरांच्या या मेहनतीला न्याय मिळावा म्हणून ‘मेड इन इंडिया’ पॅटर्न इथे राबवण्याच्या राहुल शेवाळे यांच्या कल्पनेमुळे धारावीकरांना त्यांच्या वस्तूंसाठी चांगला मोबदला मिळू शकेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

या सभेसाठी धारावीचा 90 फूट रस्ता गर्दीने फुलून गेला होता. मोठय़ा जल्लोषात आणि गगनभेदी घोषणांनी धारावीकरांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. निवडणुकीनंतर मतपेटय़ा उघडल्या जातील तेव्हाही असाच जल्लोष दाखवा आणि विजयाचे फटाके फोडा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले. शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते दिवंगत मुत्तू तेवर यांची आपल्याला उणीव भासतेय अशा भावना व्यक्त करतानाच तेवर यांच्याबरोबर काम करणारे शिवसैनिक आजही भगवा पकडून उभे आहेत याबद्दल आपल्याला अभिमान आहे असे ते म्हणाले.

देशाचा चुथडा करणाऱया काँग्रेस आघाडीला मते देणार का?

श्रीलंकेत बॉम्बस्फोट झाले. तेथील परिस्थिती भीषण आहे. लंका आपल्याच बाजूला आहे. आपले शेजारी आहेत ते असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी कसाबने मुंबईवर केलेल्या हल्ल्याची आठवण यावेळी करून दिली. कसाबशी लढताना तुकाराम ओंबळे, हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे शहीद झाले. सदानंद दाते यांनीही कसाबचा सामना करत मर्दुमकी दाखवली होती. आता काँग्रेसवाले देशद्रोह्यांविरुद्धचे, दहशतवादाविरुद्धचे कलम रद्द करण्याची भाषा करत असतील तर अशी मर्दुमकी का दाखवायची असा संतप्त सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. अतिरेकी पकडला गेला तर त्याच्याविरुद्ध खटला चालवणार नाही असे काँग्रेसवाले म्हणत आहेत. मग उद्या काँग्रेसचे राज्य आल्यावर दाऊदही इथे येईल. मग काय राहुल गांधी त्याला मांडीवर घेऊन बसणार, असेही ते म्हणाले. देशाचा असा चुथडा करणाऱयांना, देशाचे तुकडे होतील अशा घोषणा देणाऱयांना पाठीशी घालणाऱया काँग्रेस आघाडीला तुम्ही मते देणार आहात का, असा सवाल त्यांनी उपस्थितांना करताच गर्दीमधून ‘अजिबात नाही’ असा प्रतिसाद गुंजला.

मालमत्ता कर माफ केल्याने विरोधकांच्या पोटात गोळा

500 फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्याने विरोधकांच्या पोटात गोळा आला असून ते उलटसुलट आरोप करत सुटले आहेत. हिंमत असेल तर विरोधकांनी अशा घरांमध्ये राहणाऱयांना 1 जानेवारीपासून मालमत्ता कराचे बिल आले आहे का हे दाखवावे असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. मालमत्ता करमाफीमध्ये काही उणिवा असल्या तर त्या दूर करेन पण मालमत्ता कर लागणार नाही हे माझे वचन आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.

अरे ओवेसी, धारावीकर मुस्लिमांना विचार, त्यांच्या मदतीला कोण धावून येते!

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचाही समाचार यावेळी उद्धव ठाकरे यांनी घेतला. ते म्हणाले की, ‘उद्या ओवेसी धारावीत येईल. त्याला माझे आव्हान आहे, तू धारावीतल्या मुस्लिम बांधवांना विचार, रात्री-अपरात्री त्यांना काही अडचण आली तर त्यांच्या मदतीसाठी शिवसैनिक धावून येतो की नाही!’ असे उद्धव ठाकरे म्हणताच ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. शिवसैनिक हा कोणत्याही जात-पात-धर्माचा असो, तो आमचा आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. औरंगजेब हासुद्धा आपल्याला प्यारा आहे, पण हिंदुस्थानवर आक्रमण करणारा तो औरंगजेब नव्हे तर कश्मीरमध्ये देशासाठी शहीद झालेला आमचा जवान औरंगजेब असे ते म्हणाले. ही लढाई दोन धर्मांची नव्हे तर दोन देशांची आहे असे सांगतानाच देशाचा शत्रू तो माझा शत्रू आहे आणि जो बोलतो ‘ये वतन मेरा है’ तो आमचा बंधू आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

रामदास आठवले यांची खासदारकी गेली तेव्हा दिल्लीमधील त्यांचे घरातले सामानही काँग्रेस सरकारने बाहेर काढले होते. तो आठवलेंचा नाही तर बौद्धर्धीयांचा अवमान होता. आता काँग्रेसवाल्यांचे सामान आपण संसदेतून बाहेर काढले ते पुन्हा आत जायला नको याची काळजी बौद्ध बांधवांनी घ्यावी असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आमची महायुती, काँग्रेसची होणार आहे माती… – रामदास आठवले

रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी यावेळी आपल्या खुमासदार शैलीत कविता सादर करून सभेची रंगत वाढवली. ‘29 तारीख को जो होगा देखा जायेगा…काँग्रेसवाला हारेगा और शिवसेनावाला लोकसभा जायेगा’ असे आठवले म्हणताच त्यांना उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी दाद दिली. या देशात महाआघाडीला सत्ता मिळू शकत नाही हे कळल्यामुळे त्यांनी बिघडलेले इंजिन सोबत घेतले आहे. पण ‘आमची आहे महायुती…धारावीचा उद्धार करणारी महायुती आणि काँग्रेसची होणार आहे माती…’ अशी मिश्किली आठवले यांनी केली.

शिवसेना ‘वादा’ नाही, वचन देते आणि पूर्णही करते – राहुल शेवाळे

महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी यावेळी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची आणि त्याला आलेल्या यशाची माहिती यावेळी धारावीकरांना दिली. ‘क्या हुआ तेरा वादा’ असे स्टीकर घराघरावर लावणाऱया काँग्रेस आघाडी उमेदवार एकनाथ गायकवाड यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. शिवसेना ‘वादा’ नाही तर वचन देते आणि पूर्णही करते असे शेवाळे म्हणाले.

याप्रसंगी व्यासपीठावर सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते ऍड. लीलाधर डाके, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, माजी आमदार बाबूराव माने, उपमहापौर हेमांगी वरळीकर, रिपाइंचे अविनाश महातेकर, भाजपचे आमदार तमिळ सेल्वन, अनिल ठाकूर व राजेश शिरोडकर, शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर, प्रकाश फातर्पेकर, तुकाराम काते व मंगेश सातमकर, पालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत, श्रद्धा जाधव आदी उपस्थित होते.