
सामना प्रतिनिधी। वडीगोद्री
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी कसेबसे जगवलेल्या 700 मोसंबीच्या झाडांची नासधूस अज्ञात व्यक्तीने केल्याने जालनातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. ही घटना अंबड तालुक्यातील दाढेगाव येथे घडली. यात शेतकऱ्यांचे 15 लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार गोंदी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
दाढेगाव येथील उमेश संदीपान गव्हाणे या शेतकऱ्याचे दोन वर्षापूर्वी गट क्र. 178 मधील 4 एकर क्षेत्रात 700 मोसंबीच्या झाडांची लागवड केली.
दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत कसे तरी दुष्काळी परिस्थितीवर मात करीत झाडे लावली. ती जगविण्यासाठी ठिबक सिंचनही केले. मात्र मोसंबी झाडे ऐन बहारात असतांनाच रविवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने शेतात कोणी नसल्याची संधी साधून एक नव्हे दोन नव्हे तर 700 झाडे निर्दयपणे कुऱ्हाडी व विळ्याने तोडून टाकली. शेतकरी नेहमीप्रमाणे पहाटे शेताला पाणी घालण्यासाठी म्हणून गेला असता मोसंबीची झाडे आडवी झालेली त्याला दिसली.तसेच शेतातील पाईपलाईन, खत देण्याची व्हेंचुरी, ठिंबकच्या साहित्याचे नुकसान करून मोटार स्टर्टर वायर चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत तक्रार करूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतेच ठोस पाऊल उचलण्यात आले नाही.
अशीच घटना दहा-बारा दिवसापूर्वी अंतरवाली सराटी येथील शेतकरी एकनाथ आसाराम भागवत यांच्या ठिंबक साहित्याची नासधुस करुन 100 झाडे तोडली होती. याप्रकरणी एकनाथ भागवत यांनीही गोंदी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तोडलेला झाडांचा तपास पोलिसांचा सुरु असतांनाच दुसरी घटना परिसरातच घडल्याने शेतकरी हादरले आहेत.
या अगोदर शेतकऱ्यांनी दोन्ही वेळेस गोंदी पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला मात्र न्याय मिळाला नाही. आता शेती करण्याची आशाच राहीली नाही. असे शेतकरी उमेश गव्हाणे यावेळी बोलताना सांगितले.






























































