गर्दीचा फायदा घेत चोरखिशातले दागिने लांबवले ,अल्पवयीन मुलाची बालगृहात रवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

 प्रवासादरम्यान पॅण्टच्या चोरखिशात ठेवलेले 6 लाख 61 हजार रुपयांचे दागिने लांबवणाऱ्या अल्पवयीन मुलाची रवानगी बालगृहात करण्यात आली. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा कुर्ला रेल्वे पोलीस शोध घेत आहेत.

नवी मुंबई येथे राहणारे तक्रारदार हे त्याच्या वडिलांना गावी सोडण्याकरिता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आले होते. तक्रारदाराच्या वडिलांसोबत सोबत त्याचे भावोजीदेखील होते. त्याच्या वडिलांनी प्रवासादरम्यान सोने चोरी होऊ नये म्हणून पॅण्टच्या चोरखिशात ठेवले होते. त्यांनी इन केल्यामुळे काही सोने बाहेर आले होते.  कामयानी एक्स्प्रेसमध्ये बसल्यानंतर अज्ञातांनी वडिलांच्या चोरखिशातील दागिने चोरले. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक एम. इनामदार यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक एस. मोंडवे, पोलीस हवालदार डी. बारड, एम. कवठेकर यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलाला एलटीटी परिसरात फिरताना ताब्यात घेतले. त्याच्याकडून 4 लाख 86 हजार रुपयांचे दागिने जप्त केले.