श्री शंकराख्यान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चैतन्यस्वरूप ([email protected])

महाराष्ट्रभूमीचे आध्यात्मिक वैभव दिमाखाने उंचावणाऱया सिद्धहस्त संतसत्पुरुषांचा विचार करता श्रीशंकर महाराजांच्या अवतारकार्याचा कालावधी बराच अलीकडचा आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये श्रीशंकर महाराजांचे कार्य व माहात्म्य अधिक वेगाने प्रसिद्धीस आले. वृत्तपत्र आणि नभोवाणीचा प्रसार यामुळे जग अधिकाधिक जवळ येत होते. हा काळ स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या लढय़ाचा प्रारंभिक काळ होता. सर्वत्र शिक्षणाचे वारे वाहात असल्याने जनमानसाची विचारसरणी आधुनिकत्वाकडे झुकत होती. बऱयाचशा अनिष्ट रूढी अन् परंपरा मोडीत निघाल्या होत्या. मराठीसोबतच इंग्रजी शिक्षणही विनासायास उपलब्ध होत असल्यामुळे नव्या पिढीचा शिक्षण घेण्याकडे वाढता कल होता. स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील अनेकविध वर्तमानपत्रे सहजगत्या उपलब्ध होत होती. जाणिवा जागृत होत होत्या तसे संकुचितपणाचे पडदे आपसूकच गळून पडत होते. परस्परांमधील वैचारिक देवाणघेवाण आणि दळणवळणाच्या प्रगत सुविधांमुळे समाज बदलू लागला. देशामध्ये कुठेही व काहीही घडले तरी त्याची बातमी सर्वत्र, सर्वदूर वाऱयाच्या वेगाने पसरू लागली.

याच कारणाने विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांमध्ये उदयास आलेले संतसत्पुरुष, माहिती-छायाचित्रे तसेच चरित्रग्रंथांच्या रूपाने अंमळ अधिक प्रसिद्धीस आले. छायाचित्रण आणि ध्वनिमुद्रणाच्या साहाय्याने सत्पुरुषांची छबी टिपणे किंवा त्यांच्या भक्त वा शिष्य मंडळींच्या आठवणी मुलाखतींच्या रूपाने संग्रहित करणे सहज शक्य झाले. याच कारणाने श्रीशंकर महाराजांच्या अवतारकार्यातील अनेक घटना मोठय़ा संख्येने आणि विस्तृत स्वरूपात उपलब्ध झाल्या. श्रीशंकर महाराज हे संचारी सत्पुरुष असल्याने व त्यांच्या सहवासातील अनेक भक्त व शिष्यगण नावलौकिकाने श्रेष्ठ असल्याकारणाने श्रीमहाराजांविषयीची माहिती उत्तमप्रकारे संकलित केली गेली.

श्रीशंकर महाराजांचे वास्तव्य बहुत करून सोलापूर, नगर, नाशिक, पुणे या भागामध्ये झाले. या चारही परिसरांतील अनेक भक्तांकडे श्रीमहाराज बरेच दिवस वास्तव्य करून असत. त्याशिवाय, श्रीमहाराजांची दर्शनभेट घेण्यासही अनेक भक्तमंडळी येत असत. या कारणाने, श्रीमहाराजांविषयीच्या हजारो आठवणी आज कारणपरत्वे इतस्ततः विखुरल्या गेल्या आहेत. चरित्र, मासिक किंवा दैनिकांचे विशेषांक आदी माध्यमातून श्रीमहाराजांच्या भक्तांनी सांगितलेल्या आठवणी शब्दबद्ध करण्यात आल्या आहेत. त्यातील काही निवडक आठवणी पं. भगवंत वासुदेव अघोर लिखित ‘श्रीशंकरगीता’ आणि म. भ. देशपांडे लिखित ‘श्रीशंकर महाराज भक्तिविजय’ या ग्रंथांमध्ये संग्रहित करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सरदार मिरीकर, रावबहादूर नवले, योगी ज्ञाननाथजी रानडे तसेच डॉ. नागेश धनेश्वर लिखित वाङ्मयातूनही श्रीशंकर महाराजांविषयीचे वैयक्तिक तसेच अन्य काही भक्तांचे अनुभवही वाचावयास मिळतात.

श्रीशंकर महाराजांच्या अवतारकार्यातील लीलाप्रसंगांचे अनुभव ‘भक्त’ म्हणून तसेच ‘वाचक’ म्हणूनही थक्क करणारे आहेत. एखाद्या सत्पुरुषाच्या चरित्रामध्ये किती विविधता असावी? हा प्रश्न वाचकभक्ताला पडावा असे बहुआयामी दर्शन श्रीमहाराजांच्या व्यक्तित्वामध्ये आहे. श्रीमहाराजांच्या लीलांचे नेटके वर्णन त्यांच्या सहवासातील प्रत्येक भक्ताने केले असले तरीही त्यातील काही सन्माननीय अपवाद वगळता उर्वरित बहुसंख्यांनी या लीलाप्रसंगांचे नेमके संदर्भ (उदा. घटना घडली ते ठिकाण, काळ-वेळ इ.) नीटसे मांडलेले नाहीत. या कारणाने, श्रीमहाराजांच्या चरित्रामधील प्रत्येक लीलाप्रसंग कालानुरूप मांडणे गरजेचे आहे.

श्रीशंकर महाराजांचे चरित्र हे त्यांच्या ‘प्रकटीकरण ते देहविसर्जन’ या पद्धतीने वाचकभक्तांस उपलब्ध व्हावे असा मानस आहे. मात्र श्रीमहाराजांच्या कृपेने आणि आशीर्वादाने जसे लिहवून घेतले जाईल तसेच ते सादरही केले जाईल आणि या बाबतीत माझी भूमिका ‘मी तो हमाल… भारवाही’ अशीच असेल. तेव्हा अधिक वेळ न दवडता श्रीशंकरगाथेस प्रारंभ करूया. ।।श्रीस्वामीसमर्थ… जय शंकर।।