सुरेश प्रभूंनी विमानातून उतरवलेल्या बॉक्समध्ये आंबे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधून एक बॉक्स उतरविण्यात आला होता. तसाच एक पांढऱया रंगाचा बॉक्स केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या विमानातून उतरविण्यात आला. यामध्ये 15 कोटी रुपये असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी विमानातून उतरविण्यात आलेल्या या बॉक्समध्ये 15 कोटी नाही, तर आंबे असल्याची माहिती दिली आहे.

सुरेश प्रभू हे कोकणातून धुळ्याला आपल्या नातेवाईकांकडे जात होते. त्याकेळी त्यांनी पांढऱ्या रंगाचा एक बॉक्स सोबत आणला होता. हा बॉक्स विमानातून उतरवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये 15 कोटी रुपये असल्याची चर्चा आहे. या बॉक्सबद्दल सुरेश प्रभूंना विचारले असता त्यांनी थेट डोक्यावर हात मारत आपल्याकडे 15 रुपयेदेखील नाहीत, तुम्ही 15 कोटींचे काय बोलता, असा मिश्कील प्रश्न केला आहे. दरम्यान, अनिल गोटे यांनी प्रभू यांच्या विमानातून भाजपने निवडणुकीत वाटप करण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली .