ठाणेकरांच्या मताला तिहेरी ‘सुरक्षाकवच’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। ठाणे

29 एप्रिल रोजी होणाऱया मतदानासाठी ठाणे जिह्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण या लोकसभा मतदारसंघांमध्ये 62 लाख 25 हजार 194 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून मतदारांनी मतदान यंत्रांमध्ये बंदिस्त केलेले मत तिहेरी कवचमध्ये सुरक्षित राहणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यापासून ते मतमोजणीपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तिन्ही मतदारसंघांमध्ये स्ट्राँगरूम तयार केले आहेत. या स्ट्राँगरूमला सीआरपीएफ जवानांचे पहिले कवच असणार आहे. त्यानंतर एसआरपीएफ जवानांचा ताफा तैनात ठेवण्यात येणार आहे, तर स्ट्राँगरूमला चारही बाजूने पोलिसांचा वेढा असून एखादे पाखरूही हे सुरक्षाकवच भेदू शकणार नाही इतका कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

ठाणे जिह्यात ठाणे, भिवंडी, कल्याण हे लोकसभा मतदारसंघ असून मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती शनिवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 10075 पोलीस कर्मचारी 3369 होमगार्डस्, केंद्रीय निमलष्करी बलाचे 42 तर राज्य राखीव पोलीस दलाच्या 49 जवानांचा फौजफाटा यावेळी तैनात ठेवण्यात येणार आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर तपासून ती सुरक्षितपणे स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात येणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी घोडबंदर, कासारवडवली येथील न्यू होराइजन स्कॉलर स्कूल येथे स्ट्राँगरूमची व्यवस्था केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे तर भिवंडी मतदारसंघासाठी एलकुंडे येथील महावीर फाऊंडेशन प्रेसिडेन्सी स्कूल येथे स्ट्राँगरूमची व्यवस्था केली आहे. याच ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने पुढील महिनाभर सुरक्षा यंत्रणेला डोळ्यांत तेल घालून जागता पहारा द्यावा लागणार आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघात 18 लाख 85 हजार 297 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2018 च्या पोटनिवडणुकीच्या तुलनेत 1 लाख 54 हजारांनी वाढ झाली असल्याने मतदारांचा टक्का वाढला आहे. सहा विधानसभा क्षेत्रात 2177 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. नालासोपारा 489, बोईसर 353, कसई 338, विक्रमगड 348, डहाणू 327, पालघर 322 मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दारूचा महापूर
गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा दारूला जोरदार मागणी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वेळेपेक्षा यावेळी सुमारे 12 हजार 654 लिटर जादा दारू जप्त केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून ते 26 एप्रिलपर्यंत जिह्यात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे 40 लाख 69 हजार 654 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 2561 लिटर विदेशी, 32408 देशी, 42595 लिटर हातभट्टी अशी एकूण 33 लाख 65 हजार 66 लिटर दारूचा समावेश आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जप्त करण्यात आलेल्या दारूसाठय़ाच्या तुलनेत यंदाचा साठा 50 टक्क्यांनी वाढला आहे.

ठाणे जिह्यात एकूण 6 हजार 715 मतदान केंद्रे असून 13450 बॅलेट युनिट, 8033 कंट्रोल युनिट तसेच 8700 व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

प्रथमच मतदान केंद्रांवर मतदानासाठी महिला, पुरुष आणि दिव्यांग-ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन रांगांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी तसेच प्रथमोपचार किटचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

मतदान केंद्रांवर मतदानसाहित्य पोहोचवण्यासाठी 1262 बसेस, 1370 जीप, 30 टेम्पो, 45 ट्रक, 265 कार, रिक्षा अशा एकूण 2 हजार 972 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठाणे जिह्यात 6 हजार 635 दिव्यांग मतदार असून मतदान केंद्रापर्यंत त्यांना पोहोचवण्यासाठी रिक्षा व बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रांवर व्हीलचेअर, डोली याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

गेल्या वेळेस ज्या मतदान केंद्रांवर 70 टक्क्यांहून अधिक मतदान झाले असेल तसेच ज्या मतदारसंघात फोटो आयडीविनाच व्होटिंग स्लिपचे वाटप झाले असेल अशी ठाणे लोकसभा मतदारसंघात 202 केंद्रे क्रिटीकल म्हणून गृहित धरण्यात आली आहेत, तर भिवंडीत 178 क्रिटीकल मतदान केंद्रे आहेत.