
सामना ऑनलाईन। कोईम्बतूर
तामीळनाडूतील कोईम्बतूर शहरातील एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चेहऱयाला रुमाल बांधून शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने तब्बल दोन कोटी रुपयांचे सुवर्णालंकार आणि एक लाख रुपयांची रोकड लुटल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले.
कोईम्बतूर शहरातील खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शनिवारी सायंकाळी एक इसम चेहऱयाला रुमाल बांधून शिरला. यावेळी कार्यालयात केवळ दोन महिला होत्या. अज्ञातांनी दोन महिलांना बेदम मारहाण केल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्यावर सुवर्णालंकार आणि रोकड घेऊन त्याने पलायन केले.
शुद्धीवर आल्यावर महिलांनी पोलिसांना बोलाविले. फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि श्वान पथकासह पोलिसांनी कार्यालयाची तपासणी केली. दरम्यान, या चोरीच्या तपासाकरिता पाच पोलीस पथके स्थापन्यात आली असून, कार्यालयातील कर्मचारी महिलांची चौकशी करण्यात येत आहे.
फायनान्स कंपनीतील सीसीटीव्ही व इमारतीच्या दरवाजातील सीसीटीव्ही यांचे फुटेज तपासण्यात आले असून, त्यात चेहऱयाला रुमाल बांधलेला इसम फिरताना आढळून आला. चोरीची घटना घडली तेव्हा कार्यालयात सुरक्षारक्षक नव्हता, असे पोलिसांनी सांगितले.

























































