
सामना ऑनलाईन । बीजिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्यात गेल्या वर्षी चीनमध्ये नुहान येथे अनौपचारिक शिखर परिषद झाली. या शिखर परिषदेचा वर्षपूर्ती सोहळा आजपासून चीनमध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. हा सोहळा 3 मेपर्यंत चालणार आहे. चीनमधील हुबेई प्रांतात वुहान येथे कलर्स ऑफ इंडिया या बॅनरखाली हा सोहळा होत आहे.
वाणिज्य, व्यापार आणि पर्यटनाशी संबंधित हिंदुस्थानी सांस्कृतिक कार्यक्रम या सोहळय़ात पार पडणार आहेत. चीन-हिंदुस्थानमध्ये कडवा सीमावाद आहे. मोदी यांच्या बुहान शिखर परिषदेमुळे चीन-हिंदुस्थानमधील संबंधात सुधारणा झाली. ही शिखर परिषद ऐतिहासिक असल्याचे अनेक विश्लेषकांनी म्हटलेले आहे. या पार्श्वभूमीवर उभय देशांतील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी हिंदुस्थानचे दूत विक्रम मिस्त्राr यांनी हुबेई प्रांताचे कम्युनिस्ट पार्टीचे सचिव जियांग छावोसिंयाग यांच्याशी चर्चा केली. या वर्षपूर्तीनिमित्त वुहान नगरपालिकेच्या नेतृत्वाशी मिस्त्री हे चर्चा करणार आहेत.
वुहान शिखर परिषदेचा वर्षपूर्ती सोहळा हा बीजिंगमधील हिंदुस्थानी दूतावास आणि इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सने आयोजित केलेला आहे. याला चीनमधील हुबेईचे प्रांतीय सरकार, बुहान नगरपालिका यांचे सहकार्य आणि चायना आर्टस् असोसिएशनचा पाठिंबा आहे. या वर्षपूर्ती सोहळय़ात हिंदुस्थानी नृत्य, बॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित होतील. याशिवाय हिंदुस्थानमधील बौद्ध लेणी, बौद्ध तीर्थक्षेत्रे, महात्मा गांधी यांच्यावरील छायाचित्र प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. चिनी कंपन्यांनी हिंदुस्थानात गुंतवणूक करावी यासाठी वाणिज्यविषयक कार्यक्रम, पर्यटन रोड शो या कार्यक्रमानिमित्त होणार आहेत.


























































