धुळ्यात 28 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। धुळे

सकाळी आठपासून उन्हाचा तडाखा असूनही मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडले. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. सुमारे पाऊण तास रांगेत उभे राहून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत नशीब आजमावणाऱया 28 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. सकाळी 9 वाजेपर्यंत मतदार संघात सरासरी 6 टक्के मतदान झाले.

त्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढली. दुपारी 11पर्यंत सरासरी 20 टक्के मतदान झाले. तर दुपारी एकपर्यंत सरासरी 35 टक्क्यापर्यंत मतदान झाले. धुळे लोकसभा मतदार संघात यंदा 28 उमेदवारांनी आपले भाग्य आजमावले. त्यात बहुजन समाजवादी पक्षाचे संजय अपरांती, काँग्रेसचे कुणाल पाटील, भाजपाचे सुभाष भामरे, लोकसंग्रामचे अनिल गोटे, बळीराजा पक्षाचे अनिल जाधव, भारतीय अल्पसंख्याक सुरक्षा महासंघाचे मुहम्मद अन्सारी, राष्ट्रीय मराठा पार्टीचे ताहीर खाटीक, बहुजन मुक्ती पक्षाचे दिलीप पाटील, वंचित बहुजन आघाडीचे नबी अहमद, राष्ट्रीय जनसेना पक्षाचे नंदकुमार चव्हाण, भारतीय ट्रायबल पक्षाचे पंढरीनाथ मोरे, बहुजन महापार्टीचे जैनोद्दीन पिंजारी, भारतीय किसान पार्टीचे हिना मेवाती, बहुजन रिपब्लिकन सोशल पार्टीचे सीताराम वाघ याशिवाय अपक्ष उमेदवारी करणारे इर्फान मुहम्मद, इकबाल अहमद, कमाल कासमी, धिरज चोरडीया, अय्युब तडवी, दिनेश कोळी, दीपक अमृतकर, नसिम खान, नितीन खरे, सलिम पिंजारी, सुभाष शंकर भामरे, मेराजबी खान, मुहम्मद रिजवान आणि ज्ञानेश्वर ढेकळे यांचा समावेश आहे. या सर्वाचे भवितव्य सोमवारी मतदान यंत्रात बंद झाले.

सकाळी 9 नंतर मतदानाला सुरुवात झाल्यानंतर उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱयांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ते इतरांना प्रवृत्त करण्यास बाहेर पडले.