मुद्दा : गळती आणि चलती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  ज्ञानेश्वर गावडे

वास्तविक भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर त्या त्या प्रांताची ओळख तेथे राहणार्‍या भाषिकांची ओळख असते, परंतु महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही वर्षांत मराठीची गळती नि इतरांची चलती झालेली दिसते. महाराष्ट्रात तर 28 टक्के हिंदी भाषिक आहेत.  2011 च्या शिरगणतीचे प्रसिद्ध झालेल्या भाषावार आकड्यामध्ये मुंबईतील मराठी भाषिकांचा घसरलेला टक्का हेच दर्शवितो. मुंबई शहरातील परभाषिकांची संख्या 2001 च्या शिरगणतीमध्ये 25 लाख 88 हजार होती, ती 2011 च्या शिरगणतीमध्ये 35 लाख 98 हजार होत गेलेली आहे. त्याच काळात 2001 मध्ये 45 लाख 23 हजार लोकांनी मराठी भाषिक असल्याची नोंद केली होती, ती 2011 मध्ये 44 लाख चार हजार अशी नोंद मराठी भाषिक असल्याची नोंद आहे. मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे, रायगड जिह्यांतही हाच कल दिसत आहे. कारण या दोन शेजारी जिह्यांत हिंदी भाषिकांच्या वाढीत 80 टक्के वाढ झाल्याचे दिसत आहे. असा भाषिक फरक राजकारणावर व समाजकारणावर हळूहळू पडतो, निवडून आलेल्या आमदारांच्या व खासदारांच्या संख्येवर आपोआप घडतो. त्याचा विपरीत परिणाम राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या मराठी माणसावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याशिवाय पुढच्या पिढीबाबत अभ्यास केला तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतली तर त्या काळात मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मराठी पहिल्या क्रमांकावर होती. गुजराती दोन क्रमांकावर होती, हिंदी तिसर्‍या क्रमांकावर असायची तर उर्दू चौथ्या क्रमांकावर असायचे. वर्तमानकाळात मराठी विद्यार्थ्यांची संख्या चौथ्या क्रमांकावर घसरली असून गुजराती संख्या प्रथम चारमध्ये पण नाही. दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकासाठी हिंदी व उर्दूची चढाओढ लागलेली आहे.