निर्मिती सावंत, केदार शिंदे, गुरू ठाकूर यांना शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

शाहीर, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून दादा कोंडके यांची अनमोल कामगिरी आहे. यंदाच्या शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्काराची घोषणा नुकतीच झाली आहे. शाहीर दादा मांजरेकर, गीतकार गुरू ठाकूर, निर्माता भाऊराव कऱहाडे, दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेत्री निर्मिती सावंत यांना यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

कामाक्षी फिल्म्स पुणे, माणिकताई आणि पद्माकर मोरे या कोंडकेंच्या कुटुंबीयांच्या सहकार्याने विलेपार्ले लोकसेवा मंडळाच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात. बाबा कुलकर्णी, प्रदीप शेणॉय यांच्या संकल्पनेत परळच्या दामोदर नाटय़गृहात 5 ते 7 मेदरम्यान रात्री 8.30 वाजता विविध कार्यक्रम होणार आहेत. पहिल्या दिवशी गौरव सोहळा होणार असून यावेळी कोंडके यांच्या जीवनावर कलाविष्कार सादर होतील. दुसऱया दिवशी ‘विपुलरंग’ हा पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम असणार आहे. कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन नारायण जाधव यांचे आहे. तिसऱया दिवशी ‘नमन नटवरा’ आणि ‘लावण्यवेल’ हा कार्यक्रम होईल. महोत्सवाचे नियोजन मुक्ता इव्हेंट ऍण्ड हॉस्पिटॅलिटी यांचे आहे. नगरसेवक यशवंत जाधव, दत्ता पोंगडे, किसन जाधव, नगरसेविका किशोरी पेडणेकर, उर्मिला पांचाळ, बाळा खोपडे, महादेव खैरमोडे, राजेश खाडे, डॉ. सुनील हळूरकर, विवेक देशपांडे, गोपाळ शेलार, सुनील चव्हाण, डॉ. राजेश पाटील यांचा आयोजन समितीत सहभाग आहे. पुरस्कार निवड समितीत दैनिक ‘सामना’चे वृत्त संपादक रजनीश राणे, विवेक देशपांडे, नारायण जाधव, सचिन परब, नंदकुमार पाटील यांचा सहभाग आहे.