
सामना ऑनलाईन । भोपाळ
मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढविणाऱया साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना निवडणूक आयोगाने रविवारी पुन्हा एकदा नोटीस बजावली. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर तीन दिवसांची बंदी लादलेली असतानाही त्यांनी निवडणुकीचा प्रचार केला असा ठपका आयोगाने आता त्यांच्यावर ठेवला आहे. साध्वी यांच्यावरील बंदी आजच संपली.
भोपाळच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपा उमेदवार साध्वी यांच्यावर ही नोटीस बजावत बंदी असतानाही प्रचार केल्याबद्दल उत्तर मागविले आहे. गुरुवारी सकाळी 6 वाजल्यापासून साध्वी यांची बंदी सुरू झाली होती, ती रविवारी सकाळी 6 वाजता पूर्ण झाली. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी स्फोटक भाषणे केल्यावरून भोपाळच्या राज्य निवडणूक आयोगाने 72 तासांची बंदी लादली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिदीचा ढाचा पडल्याबद्दल वादग्रस्त विधाने केली होती.

























































