
सामना प्रतिनिधी। मुंबई
गेल्या 36 वर्षांपासून दर रविवारी सकाळी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन ऊर्फ बिग बी ‘जलसा’ या बंगल्यावरून आपल्या चाहत्यांना दर्शन देतात. पण रविवारी बिग बींचे दर्शन झाले नाही. यामुळे त्यांचे चाहते चांगलेच हिरमुसले. आपली प्रकृती ठीक नसल्याचे कारण सांगून आपण ‘जलसा’वरून उद्या भेटणार नाही असे बच्चन यांनी शनिवारीच चाहत्यांना सांगितले होते.
76 वर्षीय अमिताभ यांचा दांडगा उत्साह, ठरलेल्या वेळीच ठरलेल्या ठिकाणी हजर राहण्याची त्यांची वृत्ती, प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहाणे, शाकाहारी आहार घेणे याची सवयच त्यांच्या चाहत्यांना झाली आहे. ते जलसावरून दिसले नाहीत त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला. मात्र रविवारी ते बेडवरच होते. त्यांना बाहेर येता येणार नाही असे चाहत्यांना सांगण्यात आले.


























































