पुण्यात सोनसाखळी चोरांचा हैदोस, दीड तासात 6 गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यात सोनसाखळी चोरांनी हैदोस घातला आहे. सोमवारी सकाळी अवघ्या दीड तासात पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी सोनसाखळी चोरीचे 6 गुन्हे दाखल झाले आहेत. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यत पुण्यातल्या बिबवेवाडी, विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून सहा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरट्यांनी हिसकावल्या आहेत. जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयांचे सोने चोरट्यांनी लंपास केले आहे. या घटनांमध्ये विशेषत: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केले जात असल्याचे समोर आले आहे.