
सामना ऑनलाईन । भोपाळ
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांची तुलना रावणाशी केल्याने गीतकार जावेद अख्तर अडचणीत आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यासाठी त्यांच्याविरुद्ध भोपाळ येथे मानहानीची तक्रार करण्यात आली आहे.
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी 24 मे रोजी सुनावणी होणार आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या भोपाळमधून भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. 2 मे रोजी जावेद अख्तर यांनी भोपाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत साध्वी प्रज्ञा यांची तुलना रावणाशी केली होती. ते म्हणाले होते की, त्यांच्या वेशावर जाऊ नका. एखादी व्यक्ती संताचा वेश धारण करत असेल तर जरूर नाही की ती खरोखर संत आहे. विसरू नका जेव्हा रावणाने सीतेचं हरण केलं होतं, तेव्हा तोही संताच्या वेशात तिथे आला होता, असं अख्तर म्हणाले होते. अख्तर यांच्या याच विधानावरून भोपाळ येथील स्थानिक वकील राजेश कंसुरिया यांनी अख्तर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

























































