
सामना ऑनलाईन । मुंबई
अतिवृष्टीत पाणी साचून मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिका अनेक उपाय करीत असताना पाणी साचणारी नवी ठिकाणे तयार झाल्याने प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. यामध्ये एकूण 48 नवी पाणी साचणारी ठिकाणे सापडली असून यात सर्वाधिक 36 जागा या शहर विभागातील आहेत.
पावसाळा काही दिवसांवर आल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे जोरदार सुरू आहेत. यामध्ये पाणी साचू नये यासाठी पालिकेकडून अनेक अत्याधुनिक उपाय करण्यात येत आहेत. यामध्ये पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता दुप्पट करण्यात आली आहे. अशा उपाययोजनांमुळे 2017 मधील 225 ठिकाणातील 120 ठिकाणी केलेल्या कामामुळे 2018 मध्ये पालिकेला चांगला रिझल्ट मिळाला असून या जागी पाणी साचणे बंद झाले आहे. मात्र दोन वर्षांच्या आढाव्यात 2018 मध्ये पाणी साचणारी नवी 48 ठिकाणे तयार झाल्याचे समोर आले आहे. शहरातील या नव्या ठिकाणांमध्ये लालबाग, परळ, हिंदमातासह दक्षिण मुंबईतील काही ठिकाणांचा समावेश आहे. दरम्यान, पाणी साचणारी नवी ठिकाणे आढळली असली तरी या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी उपाययोजना सुरू असून नागरिकांची गैरसोय होणार नाही असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
विभाग 2017 मधील ठिकाणे नव्याने पाणी भरण्याची आढळलेली ठिकाणे
- शहर 63 36
- पूर्व उपनगरे 74 7
- पश्चिम उपनगरे 88 5
- एकूण 225 48
























































