
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातल्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. या टप्प्यातील प्रचारात बसपा अध्यक्ष मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्माने ओबीसी नसून राजकीय फायद्यासाठी ते ओबीसी असल्याचे सांगत आहेत, असा आरोप मायावती यांनी केला. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातही मायावती यांनी मोदी यांच्या जातीचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली होती. मायावती यांनी पुन्हा मोदी यांच्या जातीचा मुद्दा उपस्थित केल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
मागास जातीत जन्मलेले कोणत्या संकटांचा आणि सामाजिक विषमतेचा सामना करतात याची जाणीव मोदी यांनी नाही. ते जन्माने ओबीसी नाहीत. त्यांनी फक्त राजकीय स्वार्थासाठी ओबीसी असल्याचे दाखवले आहे. ही बाब देशाला माहित असल्याचेही त्या म्हणाल्या. जातीय़वादाच्या वेदना आणि समाजाकडून होणारे अत्याचार याची त्यांना जाण नाही. त्यांनी हे दुःख कधी भोगलेच नाही. त्यामुळे त्यांना या दुःखाची माहिती नाही. ज्यांना हे दुःखच माहिती नाही. ते तुमची समस्या दूर कशी करणार असा सवालही त्यांनी केला. सपा-बसपा महाआघाडीबाबच नरेंद्र मोदी गैरसमज पसरवत आहेत. त्यांनी अशा गोष्टी करू नयेत असेही मायवती यांनी म्हटले आहे. आमची महाआघाडी जातीच्या नावावर मत मागत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, महाआघाडी जातीच्या नावावर मत मागत असल्याचा खोटा प्रचार भाजप नेते करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मायावती यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीचा मुद्दा उपस्थित केल्याने राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे. या आधी मैनपुरीमध्ये सपाचे संरक्षक मुलायमसिंह यादव यांच्या प्रचारसभेत मायावती यांनी मुलायमसिंह हेच मागासांचे खरे नेते असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी बनावट ओबीसी असल्याचे म्हटले होते. आता त्यांनी पुन्हा हाच मुद्दा उपस्थित केला आहे.






























































