
सामना प्रतिनिधी । बोरी
जिंतूर तालुक्यातील कोक येथील रहिवासी राजू साळुंके (४०) या तरुणाचा मृतदेह परभणी जिंतूर रोड लगत ऋतिक कंट्रक्शन समोरील गोविंद कंठाळे यांच्या शेतामध्ये आज १० रोजी सकाळी सात वाजता आढळून आला.
शेतमालक गोविंद कंठाळे हे सकाळी शेतात गेले असता शेतातील लिंबाच्या झाडाखाली एक मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून आला. कंठाळे यांनी याची माहिती बोरी पोलीस ठाण्यात दिली. बोरी येथील साई धाब्यावर वेटर म्हणून काम करणाऱ्या राजू साळुंके (४०) या तरुणाचा मृतदेह असून त्याच्या अंगावर विविध ठिकाणी वार केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी परदेशी, बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, जमादार व्ही.एम. गिरी, के.जी. पतंगे, बी.डी. शिंदे, ज्ञानेश्वर चोपडे, एस.पी. सानप, पोलीस कॉन्स्टेबल सूनील कटारे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
हा अनोळखी मृतदेह कोक येथील राजू साळुंके (४०) तरुणाचा पोलीस तपासात निष्पन्न झाले. मृतदेहाचे शवविच्छेदन बोरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी गरुड यांनी केले. राजू साळुंके हा गेल्या दोन-तीन दिवसापासून घरी गेलाच नाही. तो व्यसनी असल्यामुळे घरच्यांनीही त्याची चौकशी केली नाही. राजू साळुंके यांचा मृत्यु की खून याची बोरी परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच याचे सत्य समोर येणार आहे. बोरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.































































