
सामना प्रतिनिधी । नगर
लग्न सोहळ्यात नववधु आणि नवरदेवाची हौस करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्या लढवल्या जातात. एखादी नववधु घोडयावर किंवा बुलेटवर लग्नमंडपात प्रवेश करत येते तर नवरदेवही हेलिकॉप्टरने विवाहस्थळी हजेरी लावत आपली हौस भागवतात. मात्र राहाता तालुक्यातील साकुरी येथे पार पडलेल्या एका विवाह सोहळ्यात नववधुची पाठवणी थेट हेलिकॉप्टर मधुन करण्यात आली. नववधुला सरप्राईज म्हणुन माहेरच्या मंडळींनी या अनोख्या हवाईसफरीच आयोजन केले होतं.
साकुरी येथील प्रगतशील शेतकरी सदाशीव दंडवते यांची कन्या अंजली दंडवते हिचा आज शिरूर जिल्हा पुणे येथील राहुल डफळे यांच्याशी शुभविवाह साकुरी येथे संपन्न झाला. वधु आणि वराची पाठवणी दोन्हीं कुटूंबीयांनी चक्क साकुरी ते शिरूर अशी हवाईसफर घडवत दोघांना सुखद धक्का दिला.
साकुरी येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात दंडवते आणि धानोरे तालुका शिरूर येथील डफळे परिवारातील वरवधुचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान अचानक हेलिकॉप्टर मंगल कार्यालयासमोरील मैदानावर उतरले आणि वर्हाडी मंडळी आणि नातेवाईक, मित्र परिवारात कुतूहल पहावयास मिळालं. नववधुची पाठवणी या हेलिकॉप्टरने होणार असल्याच सर्वांच्या लक्षात आले. दंडवते परिवार आणि डफळे परिवार सधन आणि प्रगतिशील शेतकरी आहेत. हुंडा पद्धती नको, मुलगा मुलगी भेद नको असा संदेश देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न असल्याच दंडवते परिवाराच्या वतीने नववधुचे चुलते बाळासाहेब दंडवते यांनी सांगितले
या अनोख्या भेटीमुळ नववधु अंजली खूप खुश दिसुन आली. मी आमच्या परिवारातील पहिली मुलगी आहे आणि परिवाराने माझी हवाई सफरीची इच्छा पुर्ण केल्याने मनस्वी आनंद होत आहे अस अंजलीने सांगितले तर राहुल याने अंजलीच्या परिवाराचे या अनोख्या भेटीच स्वागत करत आभार मानले.




























































