दादरच्या जैन मंदिरातील मूर्ती सापडली, चोराच्या माहीम येथे मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दादरच्या एमटीएनएल इमारतीसमोरील जैन मंदिरातून मुनीसुरत नाथ देवाची चांदीची मूर्ती चोरी प्रकरणाचा शिवाजी पार्क पोलिसांनी छडा लावला आहे.  रमेश परुळेकर (48) असे चोराचे नाव असून तो माहीम- रेतीबंदर येथे सापडला. पोलिसांनी देवाची मूर्ती हस्तगत केली आहे.

26 मार्चंला जैन मंदिरातून मुनीसुरत नाथ देवाची पाच किलो वजनाची चांदीची मूर्ती चोरीला गेली होती. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस निरीक्षक उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पंढरीनाथ कांदे तसेच उत्तम महाडिक, ज्ञानेश्वर केकाण, संदीप शेलार, महेंद्र बाविस्कर, विनोद पाटील या पथकाने आरोपीचा कसून शोध सुरू केला.

दूध डेअरीवाल्याकडून मूर्ती हस्तगत

जुहू तारा रोड येथील इंदिरानगर झोपडपट्टीत राहणार्‍या रमेशने मूर्ती चोरल्यानंतर जुहू येथे दूध डेअरीचा व्यवसाय करणार्‍या मंगीलाल दवे याला ती मूर्ती देऊन मोबदल्यात 1 लाख 20 हजार घेतले होते. मंगीलाल ती मूर्ती विकण्याच्या तयारीत होता, पण त्याआधीच कांदे व त्यांच्या पथकाने मंगीलालच्या घरावर धडक देऊन मुनीसुरत नाथ देवाची मूर्ती हस्तगत केली. मुंगीलाल फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

वर्दळ नसणारी मंदिर टार्गेटवर

रमेश परुळेकर याने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार मंदिरांमध्ये चोर्‍या केल्या आहेत. देवदेवतांचे सोने- चांदीचे दागिने, मुकुट तसेच मौल्यवान मूर्ती चोरल्याची कबुली परुळेकर याने दिली आहे. टापटीप राहायचे, ज्या मंदिरात फारशी वर्दळ नसते, चोरी करणे सहज शक्य होऊ शकते अशा मंदिरांना टार्गेट करतो. मग चोरीचा ऐवज विकून मिळालेल्या पैशातून नशा करतो तसेच जुगार खेळतो, असे पोलिसांनी सांगितले.