हिमालय पूल दुर्घटना-पूल धोकादायक असतानाही तो सुस्थितीत असल्याचा अहवाल दिला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल दुर्घटनेला जबाबदार असलेल्या ऑडिटर नीरज देसाईच्या जामीन अर्जाला मुंबई पोलिसांनी मंगळवारी सत्र न्यायालयात जोरदार विरोध केला. पूल धोकादायक असतानाही तो सुस्थितीत असल्याचा अहवाल ऑडिटर नीरज देसाई याने दिला. त्यामुळे पूल कोसळला व निष्पाप नागरिकांचे प्राण गेले. म्हणूनच आरोपी नीरज देसाई याची सुटका न करता न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावावा, असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला.

14 मार्चला सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे सहा जणांना आपले प्राण गमवावे लागलेत तर 31 जण जखमी झाले. ठेकेदार डी. डी. देसाई यांच्या कंपनीने तसेच पालिका अधिकाऱयांनी ऑगस्ट महिन्यात या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले व पूल सुरक्षित असल्याचा अहवाल दिला. चुकीचा स्ट्रक्टरल ऑडिट रिपोर्ट सादर केल्याने ही घटना घडली. युक्तिवाद करताना देसाई याने कोर्टाला सांगितले की, कंपनीने डिसेंबर 2016 मध्ये पुलाच्या अवस्थेबाबत अहवाल दिला होता. दुरुस्तीचे काम पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सुरू असते. पुलावरील ग्रेनाइटमुळे बांधकामाला धोका निर्माण झाला, मात्र सरकारने हा दावा फेटाळून लावला.

सरकारी पैसे वापरले
या कामासाठी त्यांनी जो निधी वापरला तो सरकारी निधी होता. असे असतानाही चुकीचा अहवाल सादर करण्यात आला आणि पूल कोसळून जीवितहानी झाली. जर त्यांनी हे काम योग्य पद्धतीने केले असते तर हा प्रसंग घडला नसता, असा युक्तिवादही सरकारच्या वतीने करण्यात आला.