
>>शब्दांकन : संजय मिस्त्री
पृथ्वीवरील हवामानामध्ये होणाऱ्या या बदलांचा विचार करताना सूर्यावर होणारे बदल आणि पॅसिफिक समुद्रावर होणाऱ्या या तापमानातील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या या द ला निना किंवा अल निनो यांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. कारण या दोन्ही गोष्टी पृथ्वीवरील हवामानावर प्रभाव टाकत असतात, परिणाम करत असतात. सध्या अल निनो सक्रियच असून तो पुढेही सक्रिय राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
जागतिक परिमंडलामध्ये अनेक बदल दिसून येत आहेत. नुकतेच बंगालच्या उपसागरामध्ये फनी नावाच्या चक्रीवादळाने समुद्रात अनेक दिवस मुक्काम करून शेवटी ओरिसामधील पुरी येथे धडकून मोठे थैमान घातले आहे. या चक्रीवादळाने मान्सूनच्या आगमनात खोडा घातलेला दिसत आहे. या वर्षी श्रीलंकेच्या किंवा केरळच्या किनारपट्टीजवळ मान्सूनच्या आगमनाच्या खुणा सुमारे दहा ते बारा दिवस उशिराने निर्माण होताना दिसून आल्या. परिणामी आपल्या महाराष्ट्रात मान्सून उशिराने म्हणजेच साधारण दहा दिवसांनी दाखल होण्याची शक्यता आहे.
उत्तर गोलार्धात अद्यापही जेट स्ट्रीम अथवा थंड ध्रुवीय वारे सक्रिय आहेत. या वर्षी केदारनाथ, बद्रीनाथ या ठिकाणची महादेवाच्या मंदिराची कवाडे बर्फवृष्टी खूप झाल्याने उशिरा उघडण्यात येत आहेत. तसेच कश्मीर खोऱ्यात गेल्या आठवड्यापर्यंत बर्फवृष्टी झालेली आहे. आपल्याकडेही सकाळच्या किमान तापमानात घट दिसून येते आहे. सकाळी सकाळी थंडगार वारे वाहू लागले आहेत.
गेल्या सहा महिन्यांतील उत्तर गोलार्धातील थंडीचा तडाखा पाहता किमान तापमान अद्यापही अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमीच दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मध्य हिंदुस्थानात विदर्भ व मराठवाड्यातील अनेक शहरांतील कमाल तापमानात वाढ झालेली दिसून आली. कारण उन्हाळ्याचे दिवस होतेच, त्यात अल निनोचा बसलेला फटका व फनी चक्रीवादळाने निर्माण केलेली स्थिती प्रामुख्याने कारणीभूत होती.
उत्तर हिंदुस्थानात धुळीची वादळे येण्यास सुरुवात होत आहे. त्याची कारणे आणखी वेगळी आहेत. ज्याला आपण धृवीय वारे किंवा पश्चिमी विक्षोपीय वारे म्हणतो ते वारे गेल्या आठवडाभरापासून उत्तर हिंदुस्थानातून वाहत आहेत. या प्रदेशात साधारणत: दोन किमी उंचीवर उणे ५० ते उणे ४० तापमान आहे. त्यामुळे उत्तरेत ही वादळे सुरू आहेत. या महिनाअखेर ही परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे दिल्लीसह अनेक ठिकाणी याचा तडाखा बसू शकतो. अल निनोची सध्याची परिस्थिती ही चिंताजनक आहे. कारण सध्या अल निनो ऐंशी टक्क्यांवर स्थिरावला आहे व त्याची ऑक्टोबर म्हणजे आपल्याकडील पावसाळा संपेपर्यंत सर्वसामान्य स्थितीत येण्याची शक्यता कमी आहे. परिणामत: मान्सूनचे आगमन लांबेल तसेच पावसाची सुरुवातही खूप समाधानकारक असेलच असे दिसत नाही.
महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता मराठवाड्यात व विदर्भात या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असणार आहे. सौर डागांची संख्या ही परिस्थिती निर्माण करीत आहे. कारण सध्या सूर्यावरील सौर डाग साखळी क्रमांक चोवीस चालू आहे अन् ती पुढील वर्षी न्यूनतम पातळी गाठेल असे अपेक्षित आहे. मात्र ही सौर साखळी वेळेआधीच न्यूनतम पातळी गाठेल असे दिसत आहे. सौर डागांची संख्या कमी झाली की, पृथ्वीच्या वातावरणात वैश्विक किरणांचा मारा वाढतो व ही वैश्विक किरणे पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या आकाशातील पावसासाठी आवश्यक ढगांच्या निर्मितीस मदत करतात. अशावेळी पृथ्वीवर छोट्या कालावधीचे लघु हिमयुग अवतरते असा इतिहास आहे.
सध्या विषुववृत्तावरील ढगांच्या निर्मितीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र मागील संशोधनाचा आधार घेतला तर हिंदुस्थानी प्रदेशात याचा परिणाम पाहता लघु हिमयुग काळात हे वाढलेले ढग उत्तरेकडे म्हणजे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमालय या भागाकडे सरकतात, असे संशोधन सांगते. त्यामुळे मराठवाड्यात व विदर्भातील प्रदेशावर कमी पावसाचे प्रमाण आढळून येते. एकूण परिस्थिती पाहता या आणि पुढील एक वर्ष आपणांस कमी पावसाचे संकेत मिळत आहेत.
(लेखक एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान वेंâद्र, संभाजीनगरचे संचालक आहेत)
[email protected]


























































