
सामना प्रतिनिधी, मुंबई
लोकसभा निवडणुकीचा रविवारी अखेरचा टप्पा पार पडल्यानंतर महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवरील निकाल काय लागतील याबाबतचा आढावा घेण्यासाठी भाजपची मंगळवारी बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीची आखणीही या बैठकीत केली जाणार असून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
भाजपने लोकसभेचे निकाल लागण्यापूर्कीच महायुतीच्या जागांचा आढावा घेऊन विधानसभेची आखणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने परवाच्या (मंगळकार) बैठकीत पुढील सहा महिन्यांतील पक्षाचा कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आदी नेते बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे.
काँग्रेसची सोमवारी बैठक
दरम्यान, विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी परवा (20 मे) काँग्रेस आमदारांची बैठक होत आहे. विधानभवनात दुपारी चार वाजता ही बैठक होईल. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्याने बैठकीत नवा नेता निवडण्यात येणार आहे. प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. बैठकीत एक ओळीचा ठराव करून नेता निवडीचा निर्णय पक्षाध्यक्ष राहुल गांधींवर सोपवला जाईल.


























































