
सामना प्रतिनिधी। नागपूर
एक्झिट पोलचा अंदाज म्हणजे अंतिम निकाल नाही, पण भाजप सत्तेत येईल याचे ते संकेत आहेत. देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असून पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत बहुचर्चित ‘पीएम मोदी’ या सिनेमाच्या पोस्टरचे नितीन गडकरी आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना गडकरी यांनी मोदींच्याच नेतृत्वातील भाजप केंद्रात येणार असल्याचा दावा केला. एक्झिट पोलचा सर्व समावेशक विचार करता या अंदाजाचे प्रतिबिंब निवडणूक निकालात दिसून येते असे त्यांनी स्पष्ट केले.
आपण पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत नसल्याचे या याधीच स्पष्ट केले आहे. आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो. त्यामुळे स्वाभाविकपणे तेच पंतप्रधान होतील. कुणाला कोणते मंत्रीपद द्यायचे आणि कोणते नाही, याचा अधिकार पंतप्रधानांनाच आहे, महाराष्ट्रातही 2014 सारखेच निकाल लागतील, असे गडकरी म्हणाले.
भय्याजी जोशी यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. त्यानंतर सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली, दोन नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंद द्वार चर्चा झाली. भाजपचे केंद्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालचे पक्षाचे प्रभारी कैलास विजयवर्गीय हे सुद्धा यावेळी उपस्थि होते.
एक्झिट पोलचे भाकीत 20 वर्षांपासून चुकीचे ठरतेय!
आंध्र प्रदेश -एक्झिट पोलने दिलेल्या अंदाजाकडे निवडणुकीचे निकाल म्हणून पाहता येणार नाही. गेल्या 20 वर्षांपासून एक्झिट पोलचे भाकीत चुकीचे ठरत आहे. त्यामुळे खरे निकाल वेगळे असू शकतात, अशी सावध भूमिका उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे.

1999 पासून जाहीर झालेले एक्झिट चुकीचे ठरत गेले आहेत. 23 मे रोजी जाहीर होणारे निकाल याहून वेगळे असू शकतात. प्रत्येक पक्षाला आपणच जिंकू अशी आशा वाटत असते. पण या विश्वासाला काहीच आधार नसतो. त्यामुळे खरा निकाल एक्झिट पोल्सप्रमाणेच लागेल अस मानणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. कोण सत्तेत येईल हे मला माहीत नाही. कोणी यावे याबद्दल मी बोलणार नाही. पण आज देशाला एका स्थिर सरकारची, शक्तीशाली नेत्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
रविवारी जाहीर झालेल्या सर्वच एक्झिट पोल्सनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार देशात येईल, असे भाकीत केले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांकडून 300चा आकडा पार करत एकहाती सत्तेचा दावा केला जात आहे. अशावेळी नायडूंसारख्या ज्येष्ठ नेत्याने भाजपच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.

































































