ज्युनियर कॉलेज संघटनेचे प्रा. अनिल देशमुख यांचे अपघाती निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि साठय़े महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक अनिल देशमुख (51) यांचे शनिवारी सकाळी नंदुरबार जिह्यातील शहादा-खेतिया मार्गावर अपघाती निधन झाले.

प्रा. देशमुख आपल्या कुटुंबासोबत मध्य प्रदेश येथील सक्राळी येथे नातेवाईकांकडे खासगी गाडीने जात असताना सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघातात देशमुख यांची पत्नी उर्मिला देशमुख (43), मुलगा भार्गव देशमुख (18) आणि हरबाबाई राऊळ (60) यांच्यासह गाडीचा चालक कुलदीप राऊळ (36) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना शहादा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशमुख हे जळगाव, पाचोरा तालुक्यातील हरेश्वर-पिंपळगाव येथील रहिवासी आहेत. सुट्टीनिमित्त ते सहकुटुंब आपल्या गावी आले होते. साठय़े महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेले प्रा. देशमुख ज्युनियर कॉलेज शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात नेहमी पुढे असत. नुकतीच त्यांची असोसिएशनच्या राज्य अध्यक्षपदावर निवड झाली होती. त्यांनी गेल्या वर्षी मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही लढवली होती. त्यांच्या अकस्मिक जाण्याने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.