आरोग्यभान : कॅन्सरपासून  मुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. वंदना धामणकर

कॅन्सरवर मात करून छान आयुष्य जगता येते हा संदेश देण्यासाठी 2 जून रोजी ‘इंटरनॅशनल कॅन्सर सर्व्हायव्हर डे’ साजरा होत आहे. मुंबईत ऑपेरा हाऊसमध्ये या दिवसानिमित्त आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशभरातील 300 जण सहभागी होऊन कॅन्सरवर कशी मात केली याचे अनुभव कथन करतील. या दिवसानिमित्त जनजागृती करण्याचा या लेखाच्या निमित्ताने एक प्रयत्न.

कॅन्सरचे नाव उच्चारताच प्रत्येकाच्या मनात धडकीच भरते. कॅन्सरचे निदान झाल्यावर बहुतांश लोक खचून जातात, पण कॅन्सरवर मात करून आनंदी आयुष्य जगणार्‍यांची संख्याही लक्षणीय आहे. कॅन्सरचे निदान, मानसिक धक्का, मग प्रदीर्घ उपचार, हॉस्पिटलचा फॉलोअप अशा सर्वांचा सामना करीत पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याचा आनंद उपभोगणार्‍यांना सलाम करण्यासाठी 2 जून रोजी ‘इंटरनॅशनल कॅन्सर सर्व्हायव्हर डे’ म्हणून साजरा होत आहे. योग्य वेळेत निदान झाले आणि उपचार मिळाले तर कॅन्सर बरा होऊ शकतो आणि कॅन्सरचे उपचार पूर्ण झाल्यानंतर नंतर पुन्हा नवे आयुष्य असते. ते छानपणे जगता येतो हा संदेश देण्यासाठी 5 जून 1988 रोजी जगातील पहिला ‘कॅन्सर सर्व्हायव्हर डे’ अमेरिकेत साजरा झाला. त्यानंतर जगातल्या इतर देशांनी ही संकल्पना पुढे नेण्यास सुरुवात केली. पुढे जून महिन्याचा पहिला रविवार हा ‘इंटरनॅशनल कॅन्सर सर्व्हाव्हर डे’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

मुंबई 2006मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. मुंबईत इंटरनॅशनल सोसायटी फॉर पीडियाट्रिक सोसायटीची एक आंतरराष्ट्रीय परिषद होती. त्यात टाटा हॉस्पिटलमधून कॅन्सरवर उपचार घेऊन पूर्णपणे बरे झालेली लहान मुले यामध्ये सहभागी झाली होती. या बैठकीतून एक ग्रुप तयार झाला. मात्र 2009मध्ये खर्‍या अर्थाने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. पुढे टाटा हॉस्पिटलमधील डॉ. पूर्णा कुरकुरे यांनी हा ग्रुप सुरू झाला आणि इंडियन कॅन्सर सोसायटी ही टाटा हॉस्पिटलशी संलग्नपणे काम करते. त्या संस्थेअंतर्गत या ग्रुपची नोंदणी झाली आणि पुढे त्याचे नामकरण ‘उगम’ असे करण्यात आले. आता उगमचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. आता उगम या ग्रुपमध्ये 300 कॅन्सरमुक्त मुलांची नोंदणी झाली आहे.

हा दिवस अधिक मोठ्या प्रमाणावर साजरा होण्याची गरज आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. जगात दरवर्षी तीन लाख बालकांना कॅन्सर होतो अशी आकडेवारी आहे. त्यात सत्तर ते एWशी हजार बालकांची हिंदुस्थानात नोंद होते. घरातल्या लहानग्याला कॅन्सरचे निदान झाले तर संपूर्ण घर उन्मळून पडते, पण बालकांमधील कॅन्सर बरा होण्याचे प्रमाण मोठ्या व्यक्तींपेक्षा अधिक आहे.

कॅन्सरमुक्त झालेल्यांनी स्थापन केलेल्या उगम ग्रुपमध्ये चौदा वर्षांच्या वरील कॅन्सरमुक्त मुला-मुलींना सहभागी करून घेतले जाते. कॅन्सरमुक्त झालेली मुले नोकरी करतात, स्वतःच्या पायावर उभे राहून लग्नही करतात, पण कॅन्सरमुक्त झालेल्या तरुण-तरुणींचे लग्न जमवताना अनेक अडथळे निर्माण होतात. कॅन्सरमुक्त झालेल्या सुमारे तीनशे मुला-मुलींची उगममध्ये नोंद झाली आहे. त्यात पाच टक्के मुले लग्नाच्या वयातील आहेत. कॅन्सर लहानपणी झाला होता, आता बरा झाला आहे असे सांगितले तरी लग्न मोडतात. कॅन्सरमुक्त झालेला एक मुलगा लग्नाच्या बाजारात उभा राहिला. चार-पाच मुलींच्या कुटुंबीयांना प्रामाणिकपणे वस्तुस्थिती सांगितली, पण पूर्वी झाला होता असे समजल्यावर मुलीच्या घरच्यांनी लग्न मोडले. त्यामुळे पुढच्या खेपेस त्याने काहीही सांगितले नाही, पण मुलीच्या वडिलांना काही काळाने कळले की, मुलाला कॅन्सर झाला होता. त्यातून फार मोठे नाटय़ घडले. अगदी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यापासून मारहाण करण्याची धमकी देण्यापर्यंत प्रकरण गेले. आपण कॅन्सरमुक्त होऊन पंधरा वर्षांचा कालावधी लोटल्याचे आणि ही सर्व वस्तुस्थिती तुमच्या मुलीला विश्वासात घेऊन सांगितली आहे, पण तुमची मुलगी ही बाब तुम्हाला सांगायला घाबरते असे त्याने मुलीच्या वडिलांना सांगितले. मुलीने तयारी दाखवली होती, पण वडील तयार नव्हते. अखेर लग्न जमले नाही.

नोकरी मिळवतानाही कॅन्सरमुक्तांच्या पुढे मोठी आव्हाने असतात. कॅन्सरचे उपचार प्रदीर्घ असतात. या काळात नोकरी गमावली जाण्याची शक्यता असते. उपचारांच्या काळात आर्थिक घडी विस्कटलेली असते. त्यामुळे कॅन्सरमुक्त झाल्यावर नोकरी मिळण्याच्या दृष्टीने इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वतीने मदत केली जाते. सरकारच्या अनेक योजना आहेत. स्वयंसेवी संस्था मदत करतात, पण तरीही कॅन्सरमुक्त झालेल्या व्यक्तीला पुन्हा त्याच मूळ कंपनीत नोकरी मिळेल याची शाश्वती नसते. नवीन नोकरी शोधतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कारण आपल्याला कॅन्सर होता, पण आता पूर्ण बरा झाला आहे असे प्रामाणिकपणे सांगितले तरी पटकन नोकरी कोणी देत नाही. कॅन्सरमुक्त होऊन पुढे डॉक्टर, इंजिनीअर, फॅशन डिझायनर, टीव्ही अभिनेत्री आणि सोशल वर्कर झाल्या आहेत. अशी यशस्वी उदाहरणे उगममध्ये दिसतात.

कॅन्सरमधून मुक्त झालेल्यांच्या समोर इतर आव्हानेही असतात. त्यांना मुख्य म्हणजे विम्याचे संरक्षण नसते. कॅन्सरमुक्त झालेली लहान मुले आहेत. त्यांच्या समोर त्यांचे पूर्ण आयुष्य असते, पण दुर्दैवाने विमा कंपन्या या मुला-मुलींना विम्याचे संरक्षण देत नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणींचा मोठा सामना करावा लागतो. त्यासाठी डॉ. डी. जे. जस्सावाला यांच्या नावाने एक फंड तयार केला आहे. दहा ते वीस वयोगटातील कॅन्सरग्रस्त मुलांचे शिक्षण खुंटले अशांना आर्थिक व मानसिक पातळीवर मदत व करीअर कौन्सिलिंग करण्याचे काम या फंडाच्या माध्यमातून होते.

कॅन्सरमुक्त झाल्यावर अनेक क्षेत्रांत या मुला-मुलींनी जमा बसवला आहे. केवळ मुले-मुली नाहीत, तर सर्वच वयोगटांतील आहेत. असे सर्वजण मिळून येत्या 2 जून रोजी हा दिवस साजरा करणार आहेत. यंदाचा ‘कॅन्सर सर्व्हायव्हर डे’ची संकल्पना पार्टनरशिप अशी आहे. यावर्षी शीव, वाडिया, केईएम रुग्णालयातील कॅन्सरमुक्त मुले-मुलीही यामध्ये सहभागी होणार आहेत. इंडियन कॅन्सर सोसायटीने इतर रुग्णालयांतही उगम हा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. या टीममधील सदस्य वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जातात व कॅन्सरवर उपचार घेत असलेल्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करतात. ‘‘आम्ही कॅन्सरमधून पूर्णपणे बरे झालो आहोत. योग्य उपचारांअंती तुम्हीही बरे व्हाल’’ अशा शब्दांत बळ देण्याचे काम हे स्वयंसेवक करतात. ही सर्व मुले आता एकत्र येऊन हा दिवस साजरा करतील. म्हणूनच इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वतीने 2 जून रोजी रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये खास कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या दिवशी कॅन्सरमुक्त झालेले किमान तीनशे जण तरी हजेरी लावतील असा अंदाज आहे. त्यात मुंबई, दिल्लीपासून चेन्नईसह इतर राज्यांतील कॅन्सरमुक्त झालली चौदा वर्षांच्या वरील मुले-मुली सहभागी होतील. या कार्यक्रमाला अभिनेते भरत जाधव दिग्दर्शित अमोल गुप्ते, गरवारे समूहाच्या अनिता गरवारे आणि सर्व प्रमुख हॉस्पिटलमधील बालकांमधील कॅन्सर विभागाचे प्रमुख हजेरी लावतील, पण मुख्य उपस्थिती असेल ती कॅन्सरमुक्त झालेल्यांची. यामध्ये कॅन्सरमधून बरी झालेली मुले-मुली नाटक,नृत्य-नाटिका कलाकारी सादर करतील. या दिवसाच्या निमित्ताने ‘चाय वुईथ उगम’ हा नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहे. यात लग्न झालेल्या जोडप्यांचा समावेश आहे. ते अनुभव कथन करतील. या कॅन्सरमुक्त मुलांच्या अनुभवावर व मागील वर्षभर केलेल्या कार्यक्रमांवर आधारित इंडियन कॅन्सर सोसायटीच्या ‘उगम कॉलिंग’ या मुखपत्राच्या आवृत्तीचे प्रकाशनही होत आहे.

[email protected]

www.indiancancersociety.org

(लेखिका इंडियन कॅन्सर सोसायटीच्या कॅन्सर सर्व्हायव्हरशिप विभागाच्या डायरेक्टर आहेत.)