
सामना प्रतिनिधी। नागपूर
राज्यातील मद्यपी आणि तळीरामांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील ड्राय डेची संख्या लवकरच कमी होणार असून यासाठी राज्य सरकारने एक समिती नियुक्त केली आहे. सध्या राज्यात सणानुसार प्रत्येक शहरात ड्राय डे जाहीर करण्यात येतो. समितीच्या अहवालानंतर राज्यात सर्वत्र ड्राय डेचे धोरण समान असेल, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
काही ठिकाणी ड्राय डेच्या नावाखाली गरज नसतानाही मद्याची दुकाने बंद केली जातात. ड्राय डेसंदर्भात जिल्हाधिकाऱयांकडे जे अधिकार आहेत त्याऐवजी संपूर्ण राज्यात ड्राय डेचे समान धोरण कसे राबवता येईल यासंदर्भात राज्य सरकारचा विचार सुरू आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.


























































