
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
केंद्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेली मानधनवाढ महाराष्ट्रात अद्यापही लागू न झाल्यामुळे या अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची लाट पसरलेली आहे. त्यासाठी सोमवारपासून येथील जिल्हा परिषदेमसोर अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) यांच्यावतीने धरणे सुरु केले आहे. त्यानंतर 11 जून रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
सप्टेंबर 2018 मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केंद्रीय मानधनवाढीची घोषणा करण्यात आली होती. अनेक राज्यात हे वाढीव मानधन दिले गेले आहे. पण महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणीच होत नसल्याचे आरोप संघटनेने केला. त्यामुळे ही मानधनवाढ तातडीने द्यावी. तसेच मानधनाच्या निम्मी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून दिली जावी. या दोन प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रभर अंगणवाडी कृती समितीच्यावतीने 3 ते 11 जून या कालावधीत हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्षा संज्योक्ती शिंदे, अंकिता महाडिक, शुभांगी मोरे, सारिका हळदणकर, स्नेहा दळवी यांनी नेतृत्व केले. सुमारे 500 महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
मंगळवार 4 जून रोजी चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी वरीलपमाणेच जिल्हा परिषदेसमोर दु. 2 ते 4 या वेळेत धरणे कार्यकमात सहभागी होणार आहेत. 6 जून रोजी रत्नागिरी, लांजा व राजापूर येथील अंगणवाडी कर्मचारीही जि. प. समोर दु. 2 ते सायं. 4 या वेळेत धरणे आंदोलन करणार आहेत.































































