रासप विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

आगामी विधानसभा निवडणूक भाजपच्या चिन्हावर न लढवता स्वबळावरच लढवण्याचा निर्धार पशुसंवर्धन मंत्री व रासपचे प्रमुख नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. तर रयत क्रांती संघटनेचे नेते व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या कमळावर निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. रासपला प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळावा तसेच कार्यकर्ते पक्षासोबत कायम जोडून राहावेत यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे रासप भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे नेते व मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपण कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू असे म्हटले आहे. रयत क्रांती संघटना ही शेती व शेतकऱयांशी संबंधित संघटना आहे, तो राजकीय पक्ष नाही. त्यामुळे मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य राहील, असे खोत यांनी स्पष्ट केले.