
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त झालेले नागरिक आता आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. मात्र, देशभरात असलेली उष्णतेची लाट 9 जूनपर्यंत कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच 8 जूनला मॉन्सून केरळात दाखल होण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच राजधानी दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानात धुळीचे वादळ येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यावेळी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, चंडीगड, पश्चिम उत्तर प्रदेशात गुरुवारी धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. मात्र, देशभरात 9 जूनपर्यंत उष्णतेचा प्रकोप कायम राहणार आहे. उत्तर हिंदुस्थानात गुरुवारी आणि शुक्रवारी धुळीच्या वादळासह अतिउष्ण वारे वाहणार आहेत. दिल्ली, हरियाणा, पंजाब,चंदीगड, राजस्थानात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मान्सूनचे आगमन लांबवणीवर पडले असून, गुरुवारी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून आता शनिवारी केरळमध्ये येणार आहे. मान्सून सध्या श्रीलंका भागात सक्रीय झाला असून, मालदीव-कोमोरीनपासून पुढे सरकला आहे. मान्सूनची वाटचाल केरळकडे सुरू असून शनिवारपर्यंत तो केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.































































