
सामना प्रतिनिधी । वसई
रिक्षा म्हटली की तीन चाकांची, बिन दारांची आणि प्रवाशांसाठी तशी कोणतीही सुरक्षा नसलेली काळीपिवळी गाडी… पण आता हे चित्र पालटले आहे, कारण वसईत महाराष्ट्रातील पहिली चारचाकी रिक्षाकार सुसाट धावत आहे. बजाज कंपनीने ही रिक्षाकार बाजारात आणली असून त्याचे पहिले ग्राहक वसईतील संजय भट हे ठरले आहेत. या रिक्षाकारमध्ये एसओएस प्रणाली जोडली असल्याने आपत्कालीन स्थितीत प्रवाशांना थेट पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधता येणार असून या अनोख्या गाडीत बसण्यासाठी वसईकरांच्या उडय़ा पडत आहेत.
संजय भट गेली 27 वर्षे वसईत तीनचाकी रिक्षा चालवतात. बजाज कंपनी नवीन चारचाकी रिक्षाकार बाजारात आणणार आहे. हे कळताच त्यांनी या अनोख्या गाडीची नोंदणी केली. विरार प्रादेशिक कार्यालयात या रिक्षाकारची नोंदणी होऊन ती भट यांना सुपूर्द करण्यात आली. साडेतीन लाख रुपये किमतीची ही जबरदस्त रिक्षाकार वसईकरांच्या पसंतीस पडली असून या रिक्षात बसण्यासाठी भट यांच्याकडे वेटिंगवर नोंदणी होत आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी या रिक्षाकारमध्ये कंपनीने अमूलाग्र बदल केले आहेत. सहा गिअर, सीट बेल्ट, सामान ठेवण्यासाठी मोठी डिकी, बंद दरवाजे, त्यांना काचा अशी व्यवस्था असल्याने प्रवाशांना कारमध्ये बसल्याचाच फिल मिळतो. यातील एसओएस सिक्युरिटी सिस्टिममुळे ही रिक्षाकार वसईत कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या रस्त्यावर धावत आहे याची माहिती थेट पोलिसांना कंट्रोल रूममध्ये बसून कळणार आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास पोलीस थेट या रिक्षाकारपर्यंत मदतीसाठी पोहोचू शकणार आहेत.
कारसारखे स्टेअरिंग
या रिक्षाला कारसारखे स्टेअरिंग असून मागील बाजूस 20 किलो सामान ठेवण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध आहे. टॅक्सीप्रमाणे मीटरही आतल्या बाजूस आहे. त्यामुळे पावसाळ्यात ते भिजण्याची भीती नाही. टेपची सुविधा असल्याने प्रवाशांचे मनोरंजनही होणार आहे.























































