
सामना प्रतिनिधी । मुंबई
कोणतीही खरेदी-विक्री झालेली नसताना गैरमार्गाने व्यापाऱयांना फक्त खोटी बिले देऊन ती खरी असल्याचे भासवत एका खासगी कंपनीच्या मालकाने राज्य शासनाला 62 लाख 26 हजारांचा चुना लावला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देत राहणार्या त्या भामट्या मालकाला डोंगरी पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
इम्तियाज मेमन (48) असे त्या भामट्याचे नाव असून त्याची फ्रेंडस् कॉर्पोरेशन नावाची कंपनी आहे. मेमन याने त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी खरेदी-विक्री झालेली नसताना लाभार्थी व्यापाऱयांना केवळ बिले दिली. तसेच देयकर व त्यावर लागलेले व्याज मागू नये म्हणून खोट्या विक्रीची बिले खरी म्हणून त्याचा वापर करून राज्य शासनाची 62 लाख 26 हजारांचा कर बुडवला. शिवाय त्यावरील वार्षिक 15 टक्के दराने होणारे व्याज बुडवून खोटे दस्ताऐवज बनवून फसवणूक केल्यामुळे सहाय्यक विक्रीकर आयुक्तांनी मेमनविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार एसीपी अविनाश धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बागडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घोरपडे, लिंगे, उपनिरीक्षक नवनाथ काळे, प्रकाश दिनकर, तसेच राजपुरे, कदम या पथकाने कसून शोधाशोध करून अखेर गुंगारा देत लपणार्या इम्पियाज मेमन याला कुर्ल्यामध्ये पकडले.


























































