जादू दाखवण्यासाठी गंगेत उतरलेले जादूगार चंचल लाहीरी बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कोलकाता

प्रेक्षकांना जादू दाखवण्यासाठी हातापायाला दोरखंड बांधून गंगा नदीत उतरलेले लोकप्रिय जादूगार चंचल लाहिरी बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. कोलकाता येथील हावडा पूल येथे रविवारी लाहीरी यांचा जादूचा प्रयोग होता. यात ते सगळ्यांसमोर हातपाय दोरखंडाने बांधून गंगेत उतरले. पण दिलेल्या वेळेत ते पाण्याबाहेर न आल्याने प्रेक्षक व त्यांचे सहकारी घाबरले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.

लाहीरी हे पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथील रहिवासी आहेत. याआधीही त्यांनी अनेक साहसी जादूचे खेळ केलेले आहेत. 2013 सालीही असाच साहसी खेळ करताना ते थोडक्यात बचावले होते. पण यावेळी त्यांनी गंगेत उतरण्यासाठी शासनाची व पोलिसांची परवानगी घेतली होती. त्यानंतर हातापायाला लोखंडाचे दोरखंड बांधून क्रेनच्या साहाय्याने ते गंगेत उतरले. पण दिलेली वेळ टळून गेली तरी ते पाण्याबाहेर आलेच नाहीत. यामुळे सगळेचजण हादरले. त्यानंतर प्रेक्षकांनी पोलिसांना फोन केला. नंतर पाणबुड्यांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आला. पण रविवारी रात्री उशीरापर्यंत लाहीरी यांचा शोध लागला नाही. यामुळे सोमवारी सकाळीही शोध मोहीम राबवण्यात आली. पण हाती निराशाच आल्याने लाहीरी यांच्या बेपत्ता होण्यामागचे रहस्य अधिकच वाढल आहे.