63ला साठ तीन म्हणायचे ,तर 6345चे वाचन कसे करणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

दुसरीच्या गणिताच्या पुस्तकातील अंक वाचनाच्या नव्या पद्धतीमुळे शिक्षकांसमोर पेच निर्माण झाला आहे. 63ला साठ तीन म्हणायचे तर तीन अंकी, चार अंकी अंक कसे वाचायचे, या प्रश्नांचे उत्तर शिक्षक शोधत आहेत. अंकवाचनाची नवी पद्धत ही शिक्षकांसाठी कठीण असल्याने ते विद्यार्थ्यांना कसे शिकवणार अशी चर्चादेखील सुरू असून या नव्या पद्धतीमुळे विद्यार्थी अंक व्यवस्थित बोलू शकतील पण लिहिण्यात त्यांची गल्लत होण्याची शक्यता गणित विषयतज्ञांनी व्यक्त केली आहे.

मराठी संख्या वाचनात जोडाक्षरांचा अडथळा येतो, bfद्यार्थ्यांना जोडाक्षरे उच्चारण्यात समस्या येते, असे स्पष्टीकरण देत 50 च्या दशकात वापरण्यात येणारी संख्या वाचनाची पद्धत बालभारतीने यंदा सुरू केली. या पद्धतीनुसार 63 त्रेसष्ठ,  73  त्र्याहत्तर  किंवा 32 बत्तीस या संख्यांचे वाचन अनुक्रमे साठ तीन, सत्तर तीन किंवा तीस दोन करण्यास म्हटले आहे. अंकवाचनाच्या या पद्धतीमुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. विद्यार्थ्यांना अंक शिकविण्याच्या नव्या पद्धतीचे शिक्षकांना प्रशिक्षणच दिलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंक शिकविताना शिक्षकांचा गोंधळ होत आहे.

अंक लिखाणात गुण जाण्याची शक्यता

नवावर सात म्हणजे सत्याण्णव अंक वाचनाची ही सोपी पद्धत पूर्वापार चालत आली आहे. पण नव्या पद्धतीनुसार नव्वद सात सत्याण्णव असे म्हणायचे आहे. वाचनासाठी ही पद्धत कठीण नसली तरी लिखाणात विद्यार्थी 97 लिहिण्याऐवजी 90 आणि 7 हे दोन अंक मिळून 907 असे देखील लिहू शकतो, असे झाल्यास विद्यार्थ्यांचे नाहक गुण जाण्याची शक्यता गणित अध्यापक मंडळाचे सहसचिव पी.के.बोंडे यांनी व्यक्त केली. शिक्षकांसाठी ही पद्धत सोईस्कर नाही. शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची पाटी कोरी असल्याने त्यांना ही पद्धत स्वीकारणे काहीसे सोपे जाणार असल्याचेही बोंडे म्हणाले.

  • 11+1/4 म्हणजेच सवा अकराचे वाचन कसे करावे याबाबत  काहीही सुचवलेले नाही. विद्यार्थ्यांनी त्याचे वाचन 11.25 हे रूपांतर करून मग त्याचे वाचन दहा एक पूर्णांक वीस पाच असे करावे का, असा प्रश्न आहे.
  • 9.31456 या संख्येचे वाचन पुढील वरच्या इयत्तेतील  मुलांनी कसे करावे, याचा खुलासादेखील करणे गरजेचे आहे.
  • अंक वाचनातील जोडाक्षरांचे प्रमाण शालेय अभ्यासक्रमातील व पाठय़पुस्तकातील एकूण जोडाक्षरांच्या तुलनेत लाखात एक या प्रमाणाहून कमी आहे. असे असताना अंकातील जोडाक्षरे अवघड जातात असे सांगून फक्त संख्या वाचनातून जोडाक्षरे वगळण्याचा निर्णय घेणे योग्य आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे.
  • 1 ते 9 हे मूलांक आहेत पण 11 ते 20 या अंकांचे वाचन कसे करायचे? अकराला एक आणि एक अकरा म्हणायचे की दहा आणि एक अकरा म्हणायचे याविषयी मार्गदर्शन केलेले नाही.

नोक्हेंबर 2009 रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार मराठी कर्ण चिन्हे, मराठी अक्षरे, मराठी जोडाक्षरे, मराठी काव्यरचना, मराठी अंक, अंकातील मराठी संख्या, अक्षरी मराठी संख्या आणि या दोन्ही प्रकारे संख्या कागदावर कशा लिहाक्यात किंवा उमटवाव्यातत याविषयी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन सविस्तर आणि पुरेसे मार्गदर्शन केलेले आहे, मात्र या पद्धतीने संख्यावाचन न करता अन्य पद्धतीने करण्याची खरेच गरज आहे का, याचा विचार बालभारतीने करावा– अनिल गोरे, सदस्य,भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य.

पहिलीत विद्यार्थ्यांना 100पर्यंत अंकांची ओळख झाली आहे. त्यामुळे दुसरीत हा बदल स्वीकारणे काहीसे अवघड होणार आहे. त्यासाठी खूप सराव असणे आवश्यक आहे. शिवाय ही पद्धत फक्त 100पर्यंतच्या अंकांना लागू होईल. पुढील तीन अंकी आणि चार अंकी अंकांचे काय करायचे, याविषयी मार्गदर्शन केले तर शिक्षकांसाठी सोयीचे होईल– फारुख काझी, प्राथमिक शिक्षक, सोलापूर.

मुलांना गणित आवडावे, अधिक सोपे जावे, इंटरेस्टिंग वाटावे यासाठी दुसरीच्या गणिताच्या विषयात महत्त्वाचे बदल केले आहेत. बेसिक गणिताला धक्का न लावता हे बदल केले असून ते विद्यार्थी आणि शिक्षकांना नक्कीच आवडतील– मंगला नारळीकर, सदस्य, गणित विषयतज्ञ समिती.