
सामना प्रतिनिधी । नॉटिंगहॅम
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये पाच सामन्यांमधून चारमध्ये विजय मिळवत आठ गुणांची कमाई केलीय. बांगलादेशने पाच सामन्यांमधून दोन विजयांसह पाच गुणांवर मोहोर उमटवलीय. आता हे दोन संघ उद्या एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. याप्रसंगी एकीकडे ऑस्ट्रेलियन संघ पाचव्या विजयासह सेमीफायनलमधील प्रवेश जवळपास निश्चित करण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल, तर दुसरीकडे बांगलादेश कांगारूंना धक्का देत आपणही उपांत्य फेरीच्या रेसमध्ये आहोत हे दाखवून देण्यासाठी धडपड करील.
सकाळच्या सत्रात वेगवान गोलंदाज चमकतील
ऑस्ट्रेलिया व बांगलादेश यांच्यामध्ये उद्या होणाऱया लढतीत तेज गोलंदाज चमकतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र वेगवान गोलंदाजांना सकाळच्या सत्रात फायदा होईल. त्यानंतर खेळपट्टी फलंदाजांना पोषक अशीच असेल. या लढतीदरम्यानही पावसाची ‘ये-जा’ सुरूच राहील. मात्र लढत पूर्ण होईल व निकालही लागेल.
स्टोयनीसचे कमबॅक
ऑस्ट्रेलियन संघात उद्याच्या लढतीत मार्कस स्टोयनीसचे कमबॅक होणार आहे. दुखापतीमुळे मागील दोन लढतींत खेळू शकला नाही, मात्र दुखापतीमधून बरा होत तो उद्या कांगारूंच्या संघात पुनरागमन करणार आहे. मार्कस स्टोयनीसच्या पुनरागमनामुळे ग्लेन मॅक्सवेलवरील गोलंदाजीचा ताण वाढणार नाही. ऑस्ट्रेलियन संघात उद्या एक फिरकी गोलंदाज असण्याची दाट शक्यता आहे.
आजची लढत
ऑस्ट्रेलिया – बांगलादेश
नॉटिंगहॅम, दुपारी 3 वाजता




























































