कुस्तीवीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वरद चव्हाण, [email protected]

राहुल आवारे. आपल्या मातीतील मल्ल. घरातल्या परंपरागत कुस्तीला राहुलने राष्ट्रीय स्तरावर नेले.

कुस्ती! आपल्या महाराष्ट्राचा आपल्या मातीचा खेळ. या खेळाने आपल्याला अनेक अनसंग हीरो दिलेत. अनसंग हीरो यासाठी म्हणतो मी कारण हिंदुस्थानात क्रिकेटला जितकं महत्त्व, प्रसिद्धी, मान दिला जातो तितकं इतर खेळांना मिळत नाही. पण कुस्ती या खेळामुळेच आपल्या महाराष्ट्राला अनेक रत्नं मिळाली आहेत. त्यातलेच एक रत्न म्हणजेच आपले आजचे सेलिब्रिटी राहुल आवारे यांनी मेहनतीने कमवलेले पुरस्कार म्हणजेच 5 वेळा नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, 2008 साली झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक, 2009 साली ज्युनियर एशियन रेस्टलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक, 2009 सालीच ज्युनियर वर्ल्ड रेस्टलिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक, 2018 साली एकविसावी कॉमन वेल्थ गेम्स 57 किलो फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक. आहे की नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला अभिमान वाटण्यासारखा राहुल आवारे! राहुलचे बाबा, आजोबा, चुलते सगळेच कुस्तीवीर होते. कुस्तीची परंपरा यांच्या परिवारातच आहे असं म्हणायला हरकत नाही. राहुलचा परिवार बीड जिह्यातला. लहानपणी वडिलांना कुस्ती खेळताना किंवा व्यायाम करताना पाहणं राहुलला खूप आवडत असे व ते करत असलेले व्यायामाचे प्रकार म्हणजेच सूर्यनमस्कार, जोर बैठका, दंड बैठका राहुल कॉपी करण्याचा प्रयत्न करीत असे. आणि अशीच त्याला कुस्तीचीसुद्धा आवड लागली. एका गोष्टीचा मला आनंद होतो की आपण अनेकवेळा वाचतो किंवा ऐकतो की आई-वडिलांच्या हट्टापायी त्यांची मुले आई-वडिलांच्या आवडत्या क्षेत्रात येतात. ‘दंगल’ चित्रपटात आपण ते पाहिलं किंवा नुकताच निवृत्त झालेल्या युवराज सिंग आणि त्याचे वडील योगीराज सिंगची कथा आपल्याला माहितीच आहे. पण राहुलच्या बाबतीत तसं नाही. आपल्या मुलालाच कुस्तीची आवड आहे हे कळताच त्याच्यावर कुठलंही प्रेशर न आणता त्याच्या वडिलांनी त्यांची तालीम घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला 10-20 सूर्यनमस्कार जेमतेम मारू शकणारा राहुल नंतर मात्र, शंभर, दोनशे, तीनशे सूर्यनमस्कार मारू लागला. व्यायामाची त्याला इतकी आवड लागली की तो दिवसातून दोनवेळा म्हणजेच सकाळ-संध्याकाळ त्याच्या बाबांबरोबर तालमीत जायचा. व्यायामाबरोबरच कुस्तीचे डावपेचही शिकू लागला. कुस्तीचा सराव दिवसातून 3-4 वेळा होऊ लागला. राहुलचे वडील शुद्ध शाकाहारी आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच त्याला 2-3 ग्लास दूध, बदामाची थंडाई, हरभरे, खारीक, खोबरं, खडीसाखर खूप खायला द्यायचे. प्रथिने फक्त चिकनमधून मिळतात असं नाही. अनेक शाकाहारी पदार्थांतूनसुद्धा प्रथिने मिळतात, अशी त्यांची ठाम समजूत आहे. त्यामुळे त्यांच्याच खुराकातला काही भाग ते राहुलसाठी ठेवत असत. वयाच्या 13-14 व्या वर्षी राहुल पुण्यात आले. पुण्यात (2004 साली) गोकुळ वस्ताद तालमीत हरिश्चंद्र बीराजदार (हिंद केसरी) यांच्या प्रशिक्षणाखाली राहुलचा खऱया अर्थाने एक कुस्तीपटू म्हणून प्रवास सुरू झाला. इथे मात्र राहुलच्या आतापर्यंत असलेल्या शाकाहारी आहारात चिकनची भर पडली. हरिश्चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल विविध स्पर्धांत सुवर्णपदकं जिंकू लागला. हरिश्चंद्र यांना राहुल हा ऑलिम्पिकमध्ये नक्कीच स्वतःचे आणि महाराष्ट्राचे नाव काढील असं वाटत होतं. आणि तशी त्यांनी राहुलवर मेहनत घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या याच दूरदृष्टीचा परिणाम म्हणजेच राहुलने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला 32 वर्षांनंतर सुवर्ण पदक मिळवून दिलं. अर्थातच हे पदक मिळवण्यामागे मेहनतही खूप आहेच. रोज सकाळी 4 वाजता उठणे मग 5 ते 8 ट्रेनिंग करणे. त्यात हिंदुस्थानी व्यायाम म्हणजेच सूर्यनमस्कार आणि सध्या नवनवीन व्यायामाचे प्रकार म्हणजेच चेन व्यायाम, मॅटवरचे व्यायाम हे होतात. संध्याकाळी परत 3-4 तासांचे ट्रेनिंग. आता इतका व्यायाम करण्यासाठी खुराकही तितकाच महत्त्वाचा. चिकन, अर्धा लिटर दूध, बदामाची थंडाई, (पोळी, डाळ, भात कमी प्रमाणात), दिवसाला 7-8 अंडी, त्यातले फक्त एक-दोन अंडय़ांमधील पिवळा भाग, बाकी एग व्हाईटस् प्रोटिनशेक पाण्यातून, व्यायाम करताना एनर्जी ड्रिंक (ग्लुकोज, इलेक्ट्रोलाईट) हे सगळे वाचूनच घाम फुटला ना? राहुलला काही गोष्टींची खंत नक्कीच आहे. आता यश मिळाल्यावर ज्या सुखसोयी त्याला आता मिळत आहेत, त्या प्रत्येकाला लहानपणापासूनच मिळाले पाहिजेत. उदा. आधी राहुल मातीत तालीम करीत होता. पुण्यात आल्यावर तीन दिवस मातीत व तीन दिवस मॅटवर तालीम करायला मिळायची. राष्ट्रीय शिबिरात गेल्यावर पूर्ण वेळ मॅटवर तालीम करायला मिळायची. हेच जर आपल्या कुस्तीपटूंना आधीपासूनच मॅट ट्रेनिंग मिळालं, त्यांच्या आहारासाठी व ट्रेनिंगसाठी स्पॉन्सर्स मिळाले तर महाराष्ट्र अनेक पदके मिळवू शकेल. तरी आधीच्या तुलनेत सध्या सरकारचा दृष्टिकोन नक्कीच सकारात्मक आहे हेही तो आवर्जून सांगतो. वाचकहो, थोडीफार आपलीसुद्धा जबाबदारी आहे बरं का, जसे क्रिकेटपटूंना आपण डोक्यावर चढवतो तसंच आपल्या हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱया प्रत्येक खेळाडूवरसुद्धा तेवढंच प्रेम केलं पाहिजे.