आयटीआय प्रवेशाच्या 50 हजार जागा वाढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यातील तरुणांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याकरिता औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये (आयटीआय) सुमारे 50 हजार प्रवेश क्षमता वाढविणार असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली.

आयटीआयमध्ये प्रवेश क्षमता वाढविण्याबाबतची लक्षवेधी राष्ट्रवादीचे सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी मांडली होती. त्यावर उत्तर देताना रणजीत पाटील म्हणाले, राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात 417 सरकारी आणि 425 खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रत्येक वर्षी सरासरी 1 लाख 40 हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध होतात.

ज्या कोर्सला कमी मागणी आहे, ते बंद करून, ज्यांना मागणी जास्त आहेत, त्याच्या प्रवेश क्षमता वाढवण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ज्यादा मागणीच्या व्यवसायाच्या 747 तुकड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवेश क्षमता 51184 ने वाढणार आहे. या चर्चेत सदस्य दत्तात्रय सावंत, सुधीर तांबे, नागोराव गाणार, रामहरी रुपनवर, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आदींनी सहभाग घेतला.