मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासा! मुख्य सचिवांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mantralaya-5

सामना प्रतिनिधी | मुंबई

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे, पाण्याची टाकी, मंत्रालयात बसविलेले आरओ यंत्र आणि जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे आदेश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच शुक्रवारी मंत्रालयात दूषित पाण्यामुळे 100 हून अधिक सरकारी कर्मचार्‍यांना जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू झाला. या घटनेचे अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील अधिकारी-कर्मचार्‍यांना पाण्यामुळे उद्भवलेल्या त्रासाची दखल घेत मुख्य सचिवांनी सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग आणि मंत्रालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांची तातडीने बैठक घेतली.

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सफाई काही दिवसांपूर्वीच झाल्याचे सार्वजनिक विभागाच्या अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. असे असूनही कर्मचार्‍यांना झालेल्या त्रासाची तीव्रता पाहता पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे, असे सांगतानाच मुख्य सचिवांनी मंत्रालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांकडून रुग्णांना झालेल्या त्रासाबाबतची माहिती घेतली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री. सगणे, मंत्रालयातील बांधकाम आणि विद्युत विभागाचे अभियंता, आरोग्य विभागाचे अधिकारी, मंत्रालयातील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

  • पाण्याचे नमुने तपासतानाच मंत्रालयात ठिकठिकाणी आरओ यंत्र बसविले आहेत त्यांची तपासणी मोहीम लगेच हाती घेण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. पाण्याच्या टाकीतून मंत्रालयात ज्या वाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा होतो त्यांचीदेखील तपासणी करावी, असेही मुख्य सचिवांनी सांगितले.